गावात पोहोचलेल्या मजुरांना ठेवले विलगीकरण कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 05:00 AM2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:01:00+5:30
तालुक्यातील मेंढा येथील जवळपास ५० मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. या सर्व मजुरांना जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली. मात्र या मजुरांना विलगीकरण कक्षात न ठेवता त्यांना होम क्वॉरंटाईन ठेवण्यात आले आहे. सदर नागरिक आता गावात खुलेआम फिरत असल्याने गावात कोरोनाचा धोका वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तेलंगणा राज्यात अडकून पडलेले मजूर शुक्रवारपासून आपापल्या गावी परतण्यास सुरूवात झाले. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार यापैकी काही मजुरांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. तर काही मजुरांना जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
गडचिरोली - तालुक्यातील मेंढा येथील जवळपास ५० मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. या सर्व मजुरांना जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली. मात्र या मजुरांना विलगीकरण कक्षात न ठेवता त्यांना होम क्वॉरंटाईन ठेवण्यात आले आहे. सदर नागरिक आता गावात खुलेआम फिरत असल्याने गावात कोरोनाचा धोका वाढला आहे. या सर्व नागरिकांना विलगीकरण कक्षातच ठेवावे, अशी मागणी गावातील नागरिक ज्ञानेश्वर धोडरे यांनी केली आहे.
गडचिरोलीपासून १२ किमी अंतरावर असलेल्या मोहझरी येथील जवळपास २० मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. सदर मजूर सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास परत आले. या सर्व मजुरांना गावातील जिल्हा परिषद शाळेत १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या सर्व मजुरांना स्वत:च्या घरून डब्बा पुरविला जात आहे.
गुड्डीगुडम - अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम येथील ३१ मजूर तेलंगणा राज्यातील गोमापूर, मादेपूर येथे मिरची तोडण्यासाठी गेले होते. सदर मजूर रविवारी परतले. या सर्व मजुरांना गुड्डीगुडम येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या नागरिकांना त्यांच्या घरची मंडळी जेवणाची व्यवस्था करीत आहेत. शाळेत सोयीसुविधांचा अभाव असल्याने राहायचे कसे, असा प्रश्न मजुरांनी उपस्थित केला आहे.
जिमलगट्टा - येथील २४ मजूर तेलंगणातील महादेवपूर परिसरात मिरची तोडण्यासाठी गेले होते. सदर मजूर ट्रॅक्टरच्या सहाय्याने ३ मे रोजी परत आले. या सर्व मजुरांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत त्यांना ठेवण्यात आले आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा हाकेच्या अंतरावर आहे. तरीही या मजुरांना घरापासून दूर राहावे लागले.
घोट - घोट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या घोट येथील ५२, नवेगाव येथील १६, निकतवाडातील ७, कर्दुळटोला येथील ५ असे एकूण ८० मजूर तेलंगणा राज्यातून परतले. या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले.
धानोरा - तालुक्यातील लेखा येथील २८ मजूर ३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता स्वगावी पोहोचले. स्थानिक जिल्हा परिषद शाळेत त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले. ट्रकद्वारे या मजुरांना महाराष्ट्रच्या सीमेजवळ आणून सोडण्यात आले. तेथून सदर मजूर पायीच राजुरा येथे पोहोचले. राजुरा पोलिसांनी या मजुरांच्या जेवणाची व आष्टीपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली. आष्टीवरून ५०० रुपये मजूर प्रमाणे तिकीट देऊन सदर मजूर गावी परतले. मजुरांची आरोग्य तपासणी केल्यानंतर या मजुरांना शाळेत क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
मुलचेरा - तालुक्यातील लगाम येथील १७ मजूर तेलंगणा राज्यातून खमम जिल्ह्यातील भद्रीतांडा येथे मिरची तोडण्यासाठी गेले होते. सदर मजूर शेतावरच राहत होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतही मिरची तोडण्याचे काम सुरूच होते. भद्रीतांडा ते कागदनगरपर्यंत या मजुरांनी ट्रकने प्रवास केला. गावात पोहोचल्यानंतर या सर्व मजुरांना राजे धर्मराव शाळेत क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये ९ महिला व ८ पुरूष आहेत. गामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साबण, मास्क उपलब्ध करून दिले. मात्र आरोग्य विभागाने एकाही मजुराची तपासणी केली नाही. एकूणच दुर्गम गावांमध्ये मजुरांची व्यवस्था करण्यास प्रशासन कमी पडत असल्याचे दिसते.
हरणघाटमार्गे परतले तीन हजार मजूर
भेंडाळा - चामोर्शी तालुक्यातील सर्वाधिक मजूर मिरची तोडण्यासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. सदर मजूर गोंडपिपरी-मूल-हरणघाट मार्गे गावाकडे परतले. हरणघाटवर पोलीस विभागाने चौकी उभारली आहे. तसेच दोटकुली येथे आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले होते. हरणघाट मार्गे येणाऱ्या प्रत्येक मजुराची नोंद करून त्याची आरोग्य तपासणी केली जात आहे. शनिवार ते मंगळवार या चार दिवसांच्या कालावधीत तीन हजार पेक्षा अधिक मजूर आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आरोग्य तपासणी केल्यानंतर संबंधित मजुरांना त्यांच्या गावी सोडले जात होते. हरणघाट पोलीस चौकीवर मजुरांच्या नोंदणीसाठी नोडल अधिकारी म्हणून केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, सचिन वाकडे, विक्रम सांगोळे, गणेश नन्नावरे यांची नियुक्ती केली. सोमवारी हरणघाटमार्गे मजुरांचे लोंढे चामोर्शी तालुक्यात प्रवेश करीत होते. दोटकुली येथे तात्पुरत्या स्वरूपात निर्माण करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रावर मजुरांची मोठी गर्दी उसळली होती. आरोग्य तपासणी केल्यानंतर मजुरांच्या हातावर क्वॉरंटाईनचे शिक्के मारले जात होते. या ठिकाणी येणाºया मजुरांच्या जेवणाची व्यवस्था जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार यांच्यामार्फत करण्यात आली होती.
परतणाऱ्यांचा तिरस्कार करू नका- प्रशासनाचे आवाहन
चामोर्शी : तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात परतणाºया मजुरांची तेलंगणा तसेच चामोर्शी तालुक्यात पोहोचल्यावर आरोग्य तपासणी करण्यात आली व हे काम सातत्याने सुरू आहे. त्यानंतर सदर मजुरांचे गृह विलगीकरण करण्यात येत आहे. मात्र अशा मजुरांचा गावातील नागरिक तिरस्कार करीत आहेत. त्यामुळे परतणाºया मजुरांचे मनोबल खचले आहे. कोणत्याही नागरिकाने परतणाºया मजुरांचा द्वेष न करता त्यांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन तालुका, महसूल व नगर पंचायत प्रशासनाने केले आहे. मजुरांची व्यवस्था करण्यासाठी गावात समिती तयार करण्यात आली असून परतलेल्या मजुरांना गावातील शाळेत, अंगणवाडी केंद्र, समाजभवन, गोटूल, महाविद्यालय येथे ठेवण्यात येत आहे. सदर मजूर हे आपल्या गावातीलच असल्याने त्यांच्याकडे संशयाने पाहून त्यांचा तिरस्कार करू नये, असे प्रशानाने म्हटले आहे. चामोर्शी तालुक्यात परराज्यातून आतापर्यंत एकूण ६ हजार २०० नागरिक परत आले आहेत. जि.प.शाळेतील रैन बसेरा केंद्रात ९८, शिवाजी हायस्कूल येथे १९७ मजूर तात्पुरत्या विलगीकरण कक्षात आहेत. विलगीकरण करण्यात आलेल्या मजूर व नागरिकांवर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांची देखरेख आहे. नगर पंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सेवाभावी संस्था व दानदात्यांमार्फत या मजुरांच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे. आ.डॉ.देवराव होळी यांच्याकडूनही काही मजुरांच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे. गावातील नागरिकांनी परराज्यातून परतलेल्या व विलगीकरण कक्षात असलेल्या नातेवाईकांना भोजनाचे डब्बे घरून पुरवावे. परंतु फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होऊ नये, असे तहसीलदार संजय गंगथळे, मुख्याधिकारी सतीश चौधरी, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर आदींनी केली आहे.