दलित वस्तीत सोयींचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:23 PM2017-10-09T23:23:56+5:302017-10-09T23:24:19+5:30
गावात नागरिकांना मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गावात नागरिकांना मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असते. परंतु स्थानिक प्रशासनच नागरिकांना सोईसुविधा उपलब्ध करून देत नसेल तर नागरिकांची गैरसोय झाल्याशिवाय राहात नाही. अशीच स्थिती अमिर्झा येथील दलित वस्तीत आहे. येथील वस्तीत मूलभूत सोईसुविधा पोहोचल्या नाहीत. स्थानिक प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
अमिर्झा येथील डॉ. आंबेडकर चौक वॉर्ड क्रमांक ३ मध्ये बौद्ध विहार ते पांडुजी सोरते यांच्या घरापर्यंत जाण्याकरिता चांगला रस्ता नाही. मागील वर्षी येथील युवा कार्यकर्ते प्रवीण टेंभुर्णे यांनी स्थानिक प्रशासनासह खासदार व जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून वस्तीतील असुविधांकडे लक्ष वेधले होते. तेव्हा ग्राम पंचायतमार्फत रस्त्यावर मुरूम टाकण्यात आले. स्थानिक प्रशासनाला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत दरवर्षी लाखो रूपयांचा निधी खर्च करावा लागतो. परंतु अमिर्झा येथे सदर निधी खर्च होत नसल्याचे वॉर्ड क्रमांक ३ मधील स्थितीवरून दिसून येते.
स्थानिक प्रशासनाकडे येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याबाबत नागरिकांच्या वतीने साकडे घालण्यात आले. परंतु ग्राम पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले. येथील नागरिकांना ये- जा करण्यासाठी योग्य रस्ता नाही. अरूंद रस्त्याने नागरिकांना जावे लागते. पावसाळ्यात चिखल तुडवित वाट काढावी लागते.
लाकडी खांबांवरून सर्विस वायर
अमिर्झा येथील दलित वस्तीत १५० ते २०० मीटरवरून सर्विस वायर टाकण्यात आले आहे. सदर वायर सिमेंट अथवा लोखंडी खांबावरून टाकणे गरजेचे होते. परंतु सदर खांब संबंधित विभागाकडून उपलब्ध न झाल्याने नागरिकांना लाकडी बल्ल्यांचा वापर करावा लागला. सदर बल्ल्या नेहमीच वाकतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.