बँकांअभावी ग्रामीण नागरिकांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:57 AM2021-01-08T05:57:39+5:302021-01-08T05:57:39+5:30
मार्कंडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा (कं.), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची ...
मार्कंडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा (कं.), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व शाळकरी मुलांना होत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविना
कोरची : शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र शाळेमध्ये वीज पुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांना वीज पुरवठा होता. मात्र वीज बिल भरले नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत. डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी शाळांमध्ये वीज पुरवठा आवश्यक झाला आहे.
पिशव्यांमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
कमाल जमीनधारणेची अट रद्द करा
अहेरी : रोहयोंतर्गत कृषी व सिंचन योजनांचा लाभ घेण्यासाठी ओबीसी लाभार्थ्यांना पाच एकरची कमाल जमीनधारणेची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ही अट हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा अधिक जमीन आहे. मात्र सदर जमीन सिंचनाअभावी पडिक आहे.
झाडाच्या फांद्यांनी झाकोळले पथदिवे
आष्टी : परिसरात बहुतांश गावांमधील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकोळले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ
भामरागड : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावामध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.