केंद्रावर बारदान्याचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:17 AM2018-12-29T01:17:56+5:302018-12-29T01:18:22+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत घोट परिसरात अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने सुरुवातील या केंद्रांवर अल्प प्रमाणात बारदान्याचा पुरवठा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत घोट परिसरात अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने सुरुवातील या केंद्रांवर अल्प प्रमाणात बारदान्याचा पुरवठा करण्यात आला. मात्र हा बारदाना लवकरच संपला. त्यानंतर महामंडळाच्या वतीने केंद्रांवर बारदान्याचा पुरवठा करण्यात आला नाही. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला बारदाणाही संपण्याच्या मार्गावर आहे. परिणामी शेतकरी अडचणीत आले आहेत.
ज्या शेतकºयांकडे बारदाना उपलब्ध आहे, त्याच शेतकऱ्यांचे धान महामंडळ व संस्थांच्या वतीने खरेदी केले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:चा बारदाना उपलब्ध नाही, असे शेतकरी धानविक्री प्रक्रियेत अडचणीत सापडले आहेत.
धानाची विक्री करूनही एक महिना उलटला. मात्र महामंडळाच्या वतीने संबंधित शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अदा करण्यात आले नाही. ३० नोव्हेंबर २०१८ पूर्वी शेतकऱ्यांचे धान चुकारे अदा करण्यात आले. मात्र त्यानंतर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे धान चुकारे प्रलंबितच आहे. घोट परिसरात गुंडापल्ली, गिलगाव, घोट, भाडभिडी, रेगडी, सोनापूर, मक्केपल्ली, अड्याळ, आमगाव, मार्र्कंडा (कं.) आदी १० धान खरेदी केंद्र आहेत. सदर १० केंद्रांवर बारदान्याचा तुटवडा आहे. मात्र या गंभीर बाबीकडे आदिवासी विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे.
आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन घोट परिसरातील सर्वच १० केंद्रांवर बारदान्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. बारदाना लवकर उपलब्ध न झाल्यास धानविक्रीअभावी शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होणार आहे.
शेतकऱ्यांकडून ३० हजार बारदान्याची खरेदी
घोट व भाडभिडी केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ३० ते ४० हजार इतका बारदाना संस्थेच्या वतीने खरेदी करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांकडेही बारदाना शिल्लक नसल्याने महामंडळाच्या केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत आहे. येत्या काही दिवसांत आविका संस्थांच्या केंद्रांवर बारदाना उपलब्ध न झाल्यास अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे नेऊन आपल्या धानाची विक्री करण्याची शक्यता आहे. मात्र खासगी व्यापाऱ्याकडे रास्त भाव मिळत नाही. यात शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होत असते.