मांड्रा गावात मूलभूत सोईसुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:27 AM2018-05-21T01:27:43+5:302018-05-21T01:27:43+5:30
तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांड्रा येथील ग्राम पंचायत कार्यालयाला स्वतंत्र इमारत नसल्याने कारभार अंगणवाडीच्या इमारतीतून चालविला जात आहे. विविध समस्यांनी येथील ग्राम पंचायत ग्रस्त असून गावाचाही विकास खोळंबला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांड्रा येथील ग्राम पंचायत कार्यालयाला स्वतंत्र इमारत नसल्याने कारभार अंगणवाडीच्या इमारतीतून चालविला जात आहे. विविध समस्यांनी येथील ग्राम पंचायत ग्रस्त असून गावाचाही विकास खोळंबला आहे.
अहेरी तालुक्यात ४० ग्राम पंचायती आहेत. मांड्रा व मोदुमडगू या दोन गावासाठी एकच ग्राम पंचायत आहे. ग्राम पंचायत अंतर्गत ९९८ इतकी लोकसंख्या आहे. शासनामार्फत प्रत्येक गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दिला जातो. परंतु शासनाच्या या प्रयत्नानंतरही मांड्रा ग्रामपंचायत विकासापासून कोसोदूर असून समस्यांचा विळख्यात सापडली आहे. गावात जायला कच्चा रस्ता असून रस्त्यावर तुटलेला पूल आहे. या पुलाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने पावसाळ्यात पुरामुळे गावाचा संपर्क तुटतो. तरीसुद्धा महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. कमलापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात अद्यापही एसटी महामंडळची बस पोहोचली नाही. खाजगी वाहनांचा आधार घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागतो. १०० टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेने ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणी मांड्रा व परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
दोन्ही परिचारिका गैरहजर
कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांड्रा येथे उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र, येथील उपकेंद्र बंद राहत असल्याने रूग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. उपकेंद्रात एक नियमित परिचारिका व एक एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र नियमित परिचारिका मागील दीड ते दोन वर्षांपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले आणि कंत्राटी परिचारिका कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती आहे. या उपकेंद्रातील दोन्ही परिचारिका विविध कारणांनी गैरहजर असतानाही येथे दुसऱ्या परिचारिकेची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती का करण्यात आली नाही, असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडित
मांड्रा येथील वीज पुरवठा मागील सहा दिवसांपासून खंडित असल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. विशेष म्हणजे या भागात लाईनमन मुख्यालयी राहत नाही. सायंकाळच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तीन ते चार दिवस तो पूर्ववत होत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय या भागात अनेक सोयीसुविधांचा अभाव असतानाही शासन, प्रशासनाचे समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.