डाेळ्यांचे पारणे फिटणाऱ्या साेमनूर संगमावर सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:08 AM2021-03-04T05:08:58+5:302021-03-04T05:08:58+5:30
अंकीसा : महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवर असलेले साेमनूर संगमाचे निसर्ग साैंदर्य डाेळ्याचे पारणे फिटणारे आहे. ...
अंकीसा : महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवर असलेले साेमनूर संगमाचे निसर्ग साैंदर्य डाेळ्याचे पारणे फिटणारे आहे. या ठिकाणचे निसर्ग साैंदर्य पाहण्यासाठी तिन्ही राज्यातील पर्यटक येतात. या ठिकाणी बससह सुविधा पुरविल्यास पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत हाेईल. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
सिरोंचा तालुक्यातील साेमनूर येथे गोदावरी व इंद्रावती या दाेन नद्यांचा संगम आहे. इंद्रावती नदी महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याची दुभाजक आहे. तर गाेदावरी नदी तेलंगणा व महाराष्ट्र राज्याची दुभाजक आहे. त्यामुळे या ठिकाणी तीनही राज्यातील पर्यटक व शालेय विद्यार्थी येतात. दाेन नद्यांचा विस्तीर्ण संगम, साेबत बाजूला माेठमाेठी पहाडी आहे. या पहाडांवर घनदाट जंगल आहे. पाण्याचा खळखळणारा आवाज कित्येक दूर अंतरावर ऐकायला येतो. निसर्ग साैंदर्याने नटलेला सोमनूर संगम विकासापासून वंचित राहिलेला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध होत नसल्याने पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. खासगी वाहनांच्या सहायाने प्रवास करावा लागत आहे. महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची यात्रा भरते. यात्रेनिमित्त या ठिकाणी माेठ्या प्रमाणात नागरिक येतात. या ठिकाणी बससह इतर सुविधा निर्माण झाल्यास पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत हाेईल. या ठिकाणी काही वेळ थांबण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी इमारतीची आवश्यकता आहे.
पर्यटकांना बसची प्रतीक्षा
सोमनूर संगम येथे महाशिवरात्रीच्या दरम्यान यात्रा भरण्यात येते. या एकच दिवशी एसटी परिवहन मंडळाच्या वतीने बस सुरू केली जाते; मात्र इतरवेळी बससुविधा राहत नाही. आसरअल्ली ते सोमनूर संगम पर्यंतच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर पूर्णपणे खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी डांबर उकळून गेले आहे.याचा मोठा त्रास पर्यटकांना होत आहे. रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.