पक्क्या रस्त्यांचा अभाव; २० गावांतील नागरिकांचा सुरू आहे खडतर प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:45 PM2024-11-12T13:45:53+5:302024-11-12T13:46:37+5:30
रेगुंठा परिसर : प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
रेगुंठा : सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या रेगुंठा परिसरातील तब्बल २० गावांमध्ये अद्यापही पक्के रस्ते नाहीत. ग्रामसडक योजनेचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे या परिसरातील, गावांतील नागरिकांना खडतर प्रवास करावा लागत आहे. मात्र, याकडे शासन व प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांचा आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर रेगुंठा हे गाव आहे. या परिसरात अद्यापही पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे. परिसरातील नागरिकांना शासकीय कामांसह इतर कामांसाठी अनेकदा तालुका मुख्यालयी जावे लागते. मात्र, पक्क्या रस्त्यांअभावी नागरिकांना त्रासदायक प्रवास करावा लागतो. पर्सेवाडा बेज्जूरपल्ली मार्गाने जीव धोक्यात घालून पहाडीवरून कच्च्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. पर्सेवाडा- बेज्जूरपल्ली हा मार्ग सिरोंचा व अहेरी या दोन्ही तालुक्यांना जोडतो. येथून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. विशेष म्हणजे, रेगुंठा परिसरांतर्गत रेगुंठा, कोटापल्ली, कोत्तूर, नारसिंहापल्ली, मुलदिम्या, मोयाबीनपेठा, बोकाटगुडम, दर्सेवाडा, पिरमडा, येल्ला, पर्सेवाडा, चिक्याला आदींसह एकूण २० गावांचा समावेश आहे. या परिसरातील गावांची लोकसंख्या १५ ते १८ हजारांच्या आसपास आहे. सदर गावांतील नागरिकांना विविध कामांसाठी सिरोंचा तालुका मुख्यालय गाठावे लागते. मात्र पक्क्या रस्त्यांअभावी त्यांची वाट खडतर बनली आहे.
बसफेरीही बंद
- रेगुंठा परिसरात पक्के रस्ते नसल्याने या भागातील बसफेरी बंद आहे. बसफेरीअभावी नागरिकांना खासगी वाहनांचा आश्रय घ्यावा लागतो. हा प्रवास बारमाही सुरू आहे. आणखी किती दिवस हा प्रवास सुरू राहणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
- रेगुंठा परिसरातील अनेक नागरिक दररोज विविध कामानिमित्त तालुका मुख्यालय सिरोंचा व अहेरी येथे येतात. त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो.