इमारतीसाठी जागेचा अभाव, डाक कार्यालय भाड्याच्या खाेलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:33 AM2021-03-22T04:33:35+5:302021-03-22T04:33:35+5:30
देसाईगंज शहराची नगर परिषद चंद्रपूर जिल्हा असताना १९६१ला अस्तित्वात आली. सद्यस्थितीत देसाईगंज शहराची लोकसंख्या ५३ हजार एवढी आहे. आजघडीला ...
देसाईगंज शहराची नगर परिषद चंद्रपूर जिल्हा असताना १९६१ला अस्तित्वात आली. सद्यस्थितीत देसाईगंज शहराची लोकसंख्या ५३ हजार एवढी आहे. आजघडीला उपविभागीय कार्यालयापासून ते तहसील कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर परिषद कर्मचारी वसाहत, पंचायत समिती, पंचायत समिती कर्मचारी वसाहत, वन विभाग वसाहत, उपवन संरक्षक कार्यालय, वखार महामंडळ आदी कार्यालयांच्या इमारती तयार झाल्या. मात्र, आजतागायत भारतीय डाक विभागाच्या कार्यालयाला मात्र शहरात इमारत बांधकामासाठी जागाच न मिळणे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ, व्यापाराचे ठिकाण देसाईगंज हे आहे. येथील डाक विभागात सर्वच प्रकारच्या नवनवीन योजना व विश्वसनीयताही आहे. परंतु जागेच्या अभावी येथील कार्यालयीन काम करताना कोंडमारा होत आहे. भारतीय डाक विभागाची जिल्हा, तालुका मुख्यालयासह मोठ्या गावांमध्ये कार्यालये आहेत. या कार्यालयात पोस्ट मास्तर कार्यरत आहेत. तसेच पोस्टमन फिल्डवर्क सांभाळतो. डाक विभागाच्या विविध विमा योजना व बचत खाते, आरडी खाते असल्याने नागरिक या कार्यालयात नेहमी जातात. मात्र, गाव पातळीवरील कार्यालये भाड्याच्या एकाच खोलीत असल्याने अपुऱ्या जागेत कामांचा पसारा सांभाळावा लागताे.
बाॅक्स
जागेचा शाेध घेण्याबाबत उदासीनता
देसाईगंज येथील डाक कार्यालयात सर्वात जास्त बचत खाती आहेत. या ठिकाणी ग्राहकांना उभे राहण्यासाठी दोन ते तीन फुटांची आयताकृती जागा आहे. वयोवृद्ध ग्राहकांना बसण्यासाठीही जागेच्या अभावी डाक विभागाकडून काहीही करता येत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त तसेच प्रौढ स्त्री - पुरुषांना मोठा त्रास सहन करावा लागताे. आजघडीला शहरात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असून, अत्यंत छोटेखानी भाड्याच्या जागेत असलेल्या डाक कार्यालयासाठी स्वत:च्या मालकीची इमारत होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जागा शोधून इमारतीचे बांधकाम करणे आवश्यक आहे. परंतु याबाबत उदासीनता दिसून येते.