भूमिगत पुलालगत गतिरोधकाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:31 AM2018-03-01T00:31:20+5:302018-03-01T00:31:20+5:30
शहरातील रेल्वे भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधकाचा अभाव असल्याने येथे होणाऱ्या किरकोळ अपघातात वाढ झाली आहे. परंतु येथे गतिरोधक निर्माण करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
ऑनलाईन लोकमत
देसाईगंज : शहरातील रेल्वे भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधकाचा अभाव असल्याने येथे होणाऱ्या किरकोळ अपघातात वाढ झाली आहे. परंतु येथे गतिरोधक निर्माण करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
देसाईगंज येथील रेल्वेच्या भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधक नसल्यामुळे या मार्गावर दररोज अपघात होत आहेत. रेल्वे फाटकाच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भूमिगत पुलाचे बांधकाम केले. भूमिगत पुलाच्या निर्मितीमुळे गोंदिया-बल्हारशा रेल्वे मार्गावरील मालवाहू व प्रवाशी रेल्वेगाड्यांच्या रहदारीने वारंवार बंद होणाऱ्या फाटकामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र पुलाच्या निर्मितीमुळे मुख्य मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला रहदारीच्या मुख्य मार्गाने जोडणारा रस्ता झाला आहे. त्यामुळे भूमिगत पुलामधून निघणाऱ्या वाहनांना कुरखेडाकडून ये-जा करणाऱ्या वाहनांची धडक होण्याची भीती दिवसागणिक वाढत आहे. कुरखेडा मार्गावर भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधकाची मागणी कित्येक दिवसापासून होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यामागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.
जडवाहनांची वाहतूक
केवळ हलक्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी भूमिगत पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र या भूमिगत पुलातून रेती वाहतुकीचे टिप्पर तसेच इतर जडवाहन आवागमन करीत असतात. अनेकदा जड वाहतुकीमुळे या पुलातील रहदारीत व्यत्यय येता. मात्र वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रास जड वाहतूक होतांना दिसून येत आहे.