बसस्थानकात पाण्याचा अभाव, प्रवाशांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:37 AM2021-04-04T04:37:46+5:302021-04-04T04:37:46+5:30
धानोरा येथे तीन वर्षांपूर्वी नवीन बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली. यामध्ये चालक-वाहकांकरिता राहण्याची सोय करण्यात आली. तसेच पाण्याकरिता टाकी ...
धानोरा येथे तीन वर्षांपूर्वी नवीन बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली. यामध्ये चालक-वाहकांकरिता राहण्याची सोय करण्यात आली. तसेच पाण्याकरिता टाकी बसविण्यात येऊन बस स्थानकात नळ फिटिंग करण्यात आली. परंतु सद्य:स्थितीत नळ बंद अवस्थेत आहे. तसेच येथील महिला व पुरुषांकरिता सुलभ शौचालय बांधण्यात आले. परंतु तेथे पाणीच नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन बस स्थानक झाल्यापासून केवळ मुरुमगाव मार्गे जाणाऱ्या बसेस गावात येतात. अन्य बसेस बस स्थानकात थांबतात. त्यामुळे बस स्थानकातच नागरिक बसची प्रतीक्षा करतात. त्यादृष्टीने येथे पिण्याकरिता पाण्याची सोय आवश्यक आहे. तसेच शौचालयात पाणी नसल्याने महिला व पुरुष प्रवासी, शालेय विद्यार्थिनी आदींना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्थानिक प्रशासन व एसटी महामंडळाने लक्ष घालून प्रवाशांची समस्या दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
बाॅक्स
अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचा त्रास
प्रवाशांच्या साेयीसाठी बस स्थानकात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे. परंतु बस स्थानक परिसरात सर्वत्र घाण व कचरा दिसून येताे. अस्वच्छतेमुळे प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागताे. काेराेना विषाणूच्या संकटकाळात स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे. परंतु याची प्रचिती धानाेरा येथील बस स्थानकावर दिसून येत नाही. बस स्थानक व सुलभ शाैचालयात नियमित साफसफाई केली जात नाही. नगरपंचायत प्रशासन या परिसरात स्वच्छता माेहीम राबविण्याकडे दर्लक्ष तर करीत नाही ना, असा सवाल नागरिक करीत आहेत.