तणसात लपवली सव्वातीन लाखाची दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:02 AM2018-12-01T01:02:08+5:302018-12-01T01:02:30+5:30
धानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पण आरमोरी तालुक्यात येणाऱ्या वडेगाव (रांगी) येथील दारू विक्रेत्याच्या शेतातील अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ३ लाख २४ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला. विशेष म्हणजे ही दारू शेतातील धानाच्या तणसाच्या ढिगात लपवून ठेवली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : धानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पण आरमोरी तालुक्यात येणाऱ्या वडेगाव (रांगी) येथील दारू विक्रेत्याच्या शेतातील अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ३ लाख २४ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला. विशेष म्हणजे ही दारू शेतातील धानाच्या तणसाच्या ढिगात लपवून ठेवली होती. ही कारवाई गुरूवारी सायंकाळी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, धानोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांना वडेगाव (रांगी) येथील दारू विक्रेता मधुकर बाबुराव कापसे या दारू तस्कराच्या दारूसाठ्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वात धानोरा ठाण्याच्या पथकाने सायंकाळी सापळा रचून शेतशिवाराच्या तणसाच्या ढिगाºयात लपवून ठेवलेल्या इम्पेरियल ब्लू (आयबी) कंपनीच्या २७ पेट्या दारू जप्त केली. या दारूची किंमत अंदाजे ३ लाख २४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही सर्व दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक हिंमतराव सरगर, पोकॉ. नितीन पिलारे, चेतन फुले, प्रकाश कृपाकर, दिनदयाल गुरभेले, रतन पुरे आदींनी केली.
धानोरा व आरमोरी तालुक्यात तस्कराचा धुमाकूळ
आरोपी मधुकर कापसे याच्यावर यापूर्वीही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. चारचाकी वाहनाने दारू आणून शेतात लपवून ठेवणे आणि दुचाकी वाहनाने इतरत्र पुरवठा करणे अशी त्याची पद्धत आहे. धानोरा, आरमोरीसह वरदा, वैरागड, मरेगाव, पिसेवरदा आदी भागात नियमित दारू पुरवठा केल्या जात असल्याचे समजते. परंतू स्थानिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. या कारवाईनंतर आरोपी कापसे फरार झाला. त्याच्यासह त्याच्या सहकाºयांचा लवकरच शोध घेऊ असे पोलिसांनी सांगितले.