रस्ता आहे की तलाव? धोकादायक खड्ड्यातून १२५ विद्यार्थ्यांंचा दररोज प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:04 PM2018-09-12T14:04:25+5:302018-09-12T14:06:44+5:30
जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात पावसामुळे रस्त्यांची दैना झाली असून, घोट परिसरातील १८ गावांमधले सुमारे सव्वाशे विद्यार्थी दररोज अत्यंत धोकादायक प्रवास करीत असल्याचे वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात पावसामुळे रस्त्यांची दैना झाली असून, घोट परिसरातील १८ गावांमधले सुमारे सव्वाशे विद्यार्थी दररोज अत्यंत धोकादायक प्रवास करीत असल्याचे वास्तव आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुलचेरा या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. ही मुले मानव विकास मिशनच्या बसने जाणे-येणे करतात. ही बस घोट येथे मुक्कामी असते व पहाटे ५.३० वाजता निघते. वाटेत सुमारे १८ गावांतील शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन ती मूलचेराला पोहचते. मात्र हा संपूर्ण मार्ग अतिशय धोकादायक बनलेला आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. यातील काही खड्डे तर ३ फूट खोल व ९ फूट लांबीचे बनले आहेत. या खड्ड्यातून जाताना विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरूनच बसावे लागते आहे. काही ठिकाणी गावकरी व विद्यार्थ्यांनी श्रमदानातून खड्डे बुजवले मात्र पावसामुळे मुरूम निघून जाऊन पुन्हा खड्डे तयार झाले आहेत. या सर्व अडचणींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत असंतोष व्यक्त होत आहे.
प्रशासनाने हे खड्डे तात्काळ बुजवावेत अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा वसंतपूर गावकऱ्यांसह अनेक गावांतील नागरिकांनी दिला आहे.