फॅन्सी नंबरसाठी लाेकांनी उडविले १५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:56+5:302021-06-30T04:23:56+5:30
गडचिराेली : आपल्याला आवडेल असा वाहन क्रमांक मिळावा, यासाठी काही वाहनचालक अतिरिक्त पैसे माेजण्यास तयार हाेतात. जून २०२० ते ...
गडचिराेली : आपल्याला आवडेल असा वाहन क्रमांक मिळावा, यासाठी काही वाहनचालक अतिरिक्त पैसे माेजण्यास तयार हाेतात. जून २०२० ते मे २०२१ या वर्षभराच्या कालावधीत काेराेनाचे संकट हाेते. तरीही गडचिराेली जिल्ह्यातील नागरिकांची फॅन्सी नंबरसाठी क्रेझ कमी झाली नाही. या वर्षभरात १७९ वाहनधारकांनी आपल्या आवडीचा क्रमांक मिळावा, यासाठी १५ लाख ५ हजार ५०० रूपये खर्च केले आहेत.
वर्षभरात काेराेनाचे संकट असल्याने इतर बाजारपेठ मंदावली असली तरी वाहनांची खरेदी मात्र कमी न हाेता वाढली आहे. लाॅकडाऊन, जिल्हाबंदी, सार्वजनिक वाहने बंद असल्याने अनेक नागरिकांनी स्वत:चे वाहन असावे, यावर विशेष भर दिला. ऐपतीनुसार काहींनी दुचाकी तर काहींनी चारचाकी वाहन खरेदी केले. आरटीओ कार्यालयाकडून नियमित शुल्क घेऊन वाहन क्रमांक दिला जाते. मात्र काही हाैशी लाेक आपल्याला अपेक्षित असलेला वाहन क्रमांक मिळावा, यासाठी अधिकचे पैसे माेजण्यास तयार हाेतात. दाेन हजार रूपयांपासून ते दीड लाख रूपयांपर्यंतचे पैसे माेजून नंबर खरेदी करता येते. काेणत्या क्रमांकासाठी किती पैसे लागतात हे अगाेदरच ठरविण्यात आले आहे.
बाॅक्स .......
फॅन्सी नंबरसाठी असा करावा अर्ज
आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या काेणत्याही नेट कॅफेमध्ये फॅन्सी नंबरबाबतचा अर्ज उपलब्ध आहे. या अर्जात माहिती भरून ताे आरटीओ कार्यालयात सादर करावा लागतो. आरटीओ कार्यालयामार्फत ऑनलाईन माहिती भरली जाते. आवश्यक असलेला वाहन क्रमांक ऑनलाईन सादर केल्यानंतर त्याची किंमत किती आहे ते उपलब्ध हाेते. त्यानंतर तेवढी रक्कम ई-पेमेंट केल्यानंतर सदर नंबर वाहनधारकाला दिला जातो, अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
काेट ......
युवावर्गामध्ये वाहनांची खूप क्रेझ आहे. अतिशय महागडे वाहन खरेदी करतात. आपल्या वाहनाला आपल्याला आवडेल असाच क्रमांक मिळावा, यासाठी इच्छुक असतात. अलीकडच्या काळात ही क्रेझ वाढत चालली आहे. गडचिराेलीसारख्या जिल्ह्यातही याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
- रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिराेली
बाॅक्स ....
नंबर नियमानुसारच लिहावा
- इच्छुक क्रमांक मिळाला तरी ताे कशाही पद्धतीने लिहिता येत नाही. अलीकडे वाहन क्रमांकाची प्लेट आरटीओ विभागामार्फत उपलब्ध करून दिली जाते. हीच प्लेट वापरावी लागते.
- आरटीओ विभागाकडून उपलब्ध झालेली नंबर प्लेट तुटल्यास ज्या शाेरूममधून वाहन खरेदी केले त्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा. दुसरी नंबर प्लेट उपलब्ध हाेते.
बाॅक्स ....
या दाेन नंबर्सना सर्वाधिक मागणी
- ७५० हा क्रमांक आदिवासींचा धार्मिक चिन्ह मानला जातो. त्यामुळे वाहनाच्या एकूण चार क्रमांकात शेवटी ७५० क्रमांक यावा, यासाठी सर्वाधिक मागणी आहे.
- ९ हा आकडा भाग्यशाली असल्याचा काही नागरिकांचा समज आहे. त्यामुळे आपल्या वाहन क्रमांकाच्या आकड्यांची बेरीज ९ येईल, असा क्रमांक निवडत असल्याचे दिसून येते.
बाॅक्स .....
या नंबरचा रेट सर्वात जास्त
तीन किंवा चारही आकडे सारखे असतील अशा क्रमांकाला सर्वाधिक मागणी राहत असल्याने वाहनधारक हजाराे रूपये माेजण्यास तयार असतात.