पावणेदाेन लाखांचा तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:38 AM2021-05-19T04:38:06+5:302021-05-19T04:38:06+5:30
विनायक आबासाहेब जुआरे व त्यांचा मुलगा रूपम जुआरे यांनी आरमाेरी येथील ताडुरवार नगरातील उपजिल्हा रुग्णालयालगत असलेल्या हिराबाई देवीकार ...
विनायक आबासाहेब जुआरे व त्यांचा मुलगा रूपम जुआरे यांनी आरमाेरी येथील ताडुरवार नगरातील उपजिल्हा रुग्णालयालगत असलेल्या हिराबाई देवीकार यांची खोली भाड्याने घेतली. या खोलीचा वापर ते मजा, ईगल कंपनीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ठेवण्यासाठी करीत हाेते. जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या त्यांच्या मालकीच्या सद्गुरू किराणा दुकानातून ते तंबाखूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती आरमाेरी पाेलिसांना मिळाली. पंचांसाेबत सुगंधित तंबाखू ठेवलेल्या खाेलीची पाहणी केली असता ती कुलूपबंद आढळून आली. खाेलीच्या चाव्या घेऊन या असा निरोप सहायक पाेलीस निरीक्षक चेतनसिंग चव्हाण व अंमलदार यांनी दिला असता रूपम व त्यांची बहीण नेहा यांनी सदर चाव्या देण्यास नकार दिला. तसेच अरेरावीची भाषा वापरून, शिवीगाळ करून चव्हाण यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यांना मोबाईलने मारण्याचा प्रयत्न केला. चव्हाण हे शासकीय कामकाज करीत असताना रूपम व नेहा यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३४ गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. खाेलीतून एक लाख ६६ हजार रुपये किमतीचा मजा कंपनीचा तंबाखू, ५ हजार ४०० रुपये किमतीचा ईगल कंपनीचा तंबाखू, दोन हजार ८०० रुपये किमतीच्या प्लास्टिक पन्नी आढळून आल्या. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक कांचन उईके करीत आहेत.