मजुरांसाठी धावली लालपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:01:00+5:30
राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले होते. या मजुरांना देसाईगंज, नागपूर येथे सोडून देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधी इतर सर्व सेवा बंद होत्या. तसेच मजुरांच्या गर्दीमुळे वाहक, चालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनमुळे सेवा बंद असल्याने एसटीवरील आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. अशाही परिस्थितीत एसटीने सामाजिक जबाबदारी पार पाडताना जिल्हाभरातील जवळपास २ हजार ५०० मजुरांना त्यांच्या गावापर्यंत एसटीने पोहोचवून दिले आहे.
केंद्र शासनाने ४ मे पासून मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. या मजुरांना तेलंगणा राज्यातील वाहने आष्टी, सिरोंचा येथे सोडत होते. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वच खासगी वाहनांची सेवा बंद असल्याने एसटीशिवाय पर्याय नव्हता. अशा संकटकाळात एसटीने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवून दिले आहे. विशेष म्हणजे शारीरिक अंतर ठेवून प्रवाशी बसविल्याने एसटीच्या प्रवाशी क्षमतेच्या केवळ अर्धेच प्रवाशी बसविले जात होते. त्यामुळे एसटीचा खर्चही भरून निघणे कठीण होते. तरीही एसटी बसगाड्या सोडण्यात आल्या. प्रत्यक्ष त्यांच्या गावापर्यंत मजुरांना सोडण्यात आले.
आंध्रप्रदेश राज्यातून काही मजूर रेल्वेने देसाईगंज येथे आले. या प्रवाशांनाही त्यांच्या गावी सोडण्यात आले. काही प्रवाशी चालत गडचिरोलीपर्यंत पोहोचत होते. गडचिरोली येथील बसस्थानकात पोहोचल्यानंतर एसटीने सोडून देण्याची विनवणी करीत होते. अशाही प्रवाशांना एसटीने त्यांच्या गावार्यंत सोडून दिले आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले होते. या मजुरांना देसाईगंज, नागपूर येथे सोडून देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधी इतर सर्व सेवा बंद होत्या. तसेच मजुरांच्या गर्दीमुळे वाहक, चालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडून दिले. गावापर्यंत पोहोचलेल्या मजुरांच्या चेहऱ्यावर एसटीच्या मदतीमुळे हास्य उमलल्याचे दिसून येत होते.
पायदळ मजूर आशेने गाठतात बसस्थानक
चंद्रपूर व इतर जिल्ह्यातून काही मजूर अजूनही परत येत आहेत. सदर मजूर गडचिरोलीपर्यंत मालवाहू किंवा इतर साधनाने येतात. गडचिरोली येथे आल्यानंतर सर्वप्रथम बसस्थानक गाठतात. या मजुरांसाठी बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे खासगी बसचालकांनी सेवा पूर्णपणे बंद केली आहे. अशा परिस्थितीत मजूर व सामान्य व्यक्तीच्या मदतीला एसटी धावून आली आहे.
एसटीने आजपर्यंत अनेक चढ-उतार बघितले आहेत. एसटीने उत्पन्नापेक्षा सामाजिक जबाबदारीला नेहमीच प्राधान्य दिले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत निम्मेच प्रवाशी बसविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. एवढे प्रवाशी बसवून एसटी चालविणे कठीण आहे. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत मजुरांचे हाल होऊ नयेत, यासाठी बसेस सोडण्यात आल्या. अडचणीच्या काळात एसटी मजुरांच्या मदतीसाठी धाऊन गेली, याचे समाधान आहे.
- अशोककुमार वाडीभस्मे,
विभाग नियंत्रक, गडचिरोली