मेडिगड्डा प्रकल्पासाठी जबरीने जमिनीचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:38 AM2019-02-10T01:38:29+5:302019-02-10T01:39:57+5:30
कौसर खान । लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : तेलंगणा सरकारतर्फे गोदावरी नदीवर बांधल्या जाणाऱ्या मेडिगड्डा धरणासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी ...
कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा सरकारतर्फे गोदावरी नदीवर बांधल्या जाणाऱ्या मेडिगड्डा धरणासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. मात्र त्यांची जमीन बळजबरीने अधिग्रहीत करण्याचा प्रयत्न तेलंगणा सरकारकडून केला जात आहे. संबंधित शेतकऱ्यांना तुरूंगात डांबण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा तेलंगणा राज्याला होणार असल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री सी.चंद्रशेखर राव हे स्वत: लक्ष घालून प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तेलंगणा सरकार मोठ्या प्रमाणात या प्रकल्पावर खर्च करीत आहे. सिरोंचा तालुक्यातील १० ते १५ गावांची जमीन या प्रकल्पामध्ये जाणार असल्याने नागरिकांमध्ये या प्रकल्पाविषयी तीव्र नाराजी आहे.
यापूर्वीही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून मेडिगड्डा प्रकल्प होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही विरोध दर्शविला, मात्र तेलंगणा सरकारने महाराष्ट्र शासनावर दबाव आणला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला न जुमानताच प्रकल्पाचे काम रेटले जात आहे. लंबटपल्ली ते नडीगुडा गावापर्यंतच्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पात जाणार आहे. पोचमपल्लीतील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असता, त्यांना तेलंगणातील पोलीस स्टेशनमध्ये बोलवून मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या शेतकºयांनी जमीन देण्यास नकार दिला, त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. महाराष्ट्र शासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.