रेल्वेमार्गाच्या जमीन खरेदीकरिता लांजेडातील भूधारकांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:31 PM2017-12-03T22:31:19+5:302017-12-03T22:31:45+5:30
वडसा (देसाईगंज) ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाने आता वेग घेतला आहे. प्रकल्पासाठी भूसंपादनाची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे. त्याअंतर्गत वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वडसा (देसाईगंज) ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाने आता वेग घेतला आहे. प्रकल्पासाठी भूसंपादनाची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे. त्याअंतर्गत वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येणार आहे. रेल्वेसाठी जमीन खरेदीकरिता लांजेडा येथील भूधारकांची सभा सोमवार दि.४ डिसेंबर रोजी गडचिरोली उपविभागीय अधिकारी कार्यालयात होणार आहे.
गावकºयांच्या जमिनीला शासनाकडून किती भाव दिला जाणार, प्रकल्पग्रस्तांना इतर कोणकोणते फायदे होणार याची माहितीही यावेळी दिली जाणार आहे. मात्र शासनाने ठरविलेला दर गावकºयांना मान्य नसल्यास त्याबाबत वाटाघाटी करून गावकºयांची जमीन देण्यासाठी मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे.
या रेल्वेमार्गासाठी ज्या व्यक्तींची जमीन खरेदी करावयाची आहे त्याचा मालकी हक्क अधिकार तपासून पाहण्याचे काम विधिज्ञांमार्फत पूर्ण झाले आहे. जमिनींच्या दर निश्चितीचे काम नगर रचना विभागाकडून करण्यात आले. आता वाटाघाटीव्दारे भूसंपादनाची प्रक्रिया वडसा तसेच गडचिरोली येथील उपविभागीय कार्यालयांमध्ये होणार आहे.
दोन्ही उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये प्रकल्पग्रस्त लोकांच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
आज बैठक
या रेल्वेमार्गात जमीन जाणाऱ्या मौजा लांजेडा येथील संबंधित भूधारकांची बैठक सोमवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे होणार आहे. त्या भूधारकांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.