अहेरीत आदिवासींच्या जमिनी भूमाफियांच्या घशात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 05:39 PM2024-07-03T17:39:53+5:302024-07-03T17:41:49+5:30

चौकशीसाठी उपोषण सुरू : पडताळणी करण्याची कंकडालवार, मडावी यांची मागणी

Land mafia grabs the lands of tribes living in Aheri | अहेरीत आदिवासींच्या जमिनी भूमाफियांच्या घशात

Land mafia grabs the lands of tribes living in Aheri

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याच्या आरोपाखाली नगररचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) ही न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भूखंड घोटाळा चर्चेत आहे. अशातच अहेरी येथेही फेरफारमध्ये गैरव्यवहार करून आदिवासींच्या जमिनी माफियांनी बळकावल्याचा आरोप करून जि. प.चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर यांनी २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

अहेरी नगरपंचायत हद्दीत महसूल व नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून काही माफियांनी जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचा आंदोलनकर्त्यांचा दावा आहे. मयत असतानाही व्यक्ती जिवंत दाखवून जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करणे, पूररेषेतील भागात सर्रास अकृषिक परवाने मिळवून भूखंड विक्रीस काढणे तसेच मूळ दस्तऐवजांमध्येही बदल करून गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सर्व्हे क्र. २०७च्या जमिनीचे मालकी हक्कदारांच्या मृत्यूनंतर खोटी संमती दाखवून पोटहिस्सा केलेल्या प्रकरणाची व सदर मृत व्यक्तीला जिवंत दाखवून एनएपी-३४ करिता मागणी केलेल्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अनधिकृत प्लॉट खरेदी केलेल्या प्रकरणाची चौकशी करून अकृषीचे परवाने रद्द करावेत. बेकायदेशीर भूखंडांवर शासकीय निधीतून केलेला खर्च संबंधितांकडून वसूल करावा, आदी मागण्यांचा उल्लेख आहे.


अतिक्रमण नोंदवहीची तपासणी करून गुन्हे नोंदवावेत
• तत्कालीन भूमी अभिलेख उपअधीक्षक एन. जी. पठाण यांच्या कार्यकाळात झालेले संपूर्ण फेरफार व संपूर्ण प्रॉपर्टी कार्ड तसेच गावठाण अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली, चेरपल्ली, वांगेपल्ली येथील एनएपी ३४च्या सर्व जमिनींची चौकशी
करून कारवाई करावी.
• प्रॉपर्टी कार्ड क्र. १४०९ सीट क्र. ०९मध्ये आदिवासी प्रॉपर्टी कार्ड गैरआदिवासी यांच्याशी खरेदी - विक्री करण्यात आले असून, आदिवासी प्रॉपर्टी गैरआदिवासी खरेदी विक्रीची चौकशी करावी.
• अहेरी साजा क्र. ०१ मध्ये अतिक्रमण नोंदवहीत खाडाखोड व हेतुपरस्सर चढविलेल्या नावांची सखोल चौकशी करून अतिक्रमण नोंदवहीची संपूर्ण चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आहे.


ही सर्व प्रकरणे जुनी आहेत. त्यामुळे तेव्हा नेमके काय झाले, हे चौकशीनंतर समोर येईल. याबाबत वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- आदित्य जीवने, उपविभागीय अधिकारी,अहेरी

Web Title: Land mafia grabs the lands of tribes living in Aheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.