जमीन मालकांना विश्वासात घेऊनच होणार अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:17 AM2018-02-23T00:17:43+5:302018-02-23T00:18:03+5:30
शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्यानंतरच गोंडवाना विद्यापीठासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जाईल, ज्या शेतकऱ्याची जमीन विद्यापीठासाठी अधिग्रहीत केली जाणार आहे, त्यातील प्रत्येक शेतकऱ्यासोबतच चर्चा केली जाईल,....
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्यानंतरच गोंडवाना विद्यापीठासाठी जमिनीचे अधिग्रहण केले जाईल, ज्या शेतकऱ्याची जमीन विद्यापीठासाठी अधिग्रहीत केली जाणार आहे, त्यातील प्रत्येक शेतकऱ्यासोबतच चर्चा केली जाईल, अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन आेंबासे यांनी शेतकऱ्यांनी दिली.
आरमोरी मार्गावरील अडपल्ली, गोगावजवळील सुमारे २०० एकर जमीन विद्यापीठासाठी अधिग्रहीत करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. जमिनीचे मोजमाप सुरू आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, त्यातील सुमारे ९५ टक्के शेतकरी जमीन देण्यासाठी अजिबात तयार नाही. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही प्रशासन जमिनीचे मोजमाप करीत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी शेतकऱ्यांना उपविभागीय कार्यालयात बोलविले होते. यावेळी जवळपास ९५ टक्के शेतकऱ्यांनी विद्यापीठाला जमीन देण्यास नकार दर्शविला. जे शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत, अशा शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत केली जाणार नाही. जमीन अधिग्रहीत करण्याची सहमती दर्शविल्यानंतर जमिनीच्या भावाबाबत तडजोड केली जाईल, अशी माहिती ओंबासे यांनी दिली.
गाव सोडावे लागण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती
शेतीतून मिळणारे उत्पन्न व गडचिरोली शहरात मिळणारी मजुरी या भरवशावर आपला प्रपंच सुरू आहे. जमीन गेल्यानंतर आपल्याला केवळ मजुरीच्या भरवशावर प्रपंच भागवावा लागेल. गावात जमीन नसल्याने गावही सोडावे लागेल. काही मोठे शेतकरी जमीन देणार असतील तर त्यांनी खुशाल द्यावी, आपण मात्र कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकºयांनी एसडीओंसमोर व्यक्त केली.