गडचिरोलीत स्फोटकांसह अन्य साहित्याचा मोठा साठा पोलिसांच्या हाती; जिवंत कुकर बॉम्बचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 07:48 PM2022-02-24T19:48:09+5:302022-02-24T19:48:37+5:30
Gadchiroli News घातपाती कारवाया करून आपली दहशत पसरविण्यासाठी नक्षलवाद्यांकडून वापरली जाणारी स्फोटके व साहित्याचा साठा गडचिरोलीत पोलिसांच्या हाती लागला.
गडचिरोली : घातपाती कारवाया करून आपली दहशत पसरविण्यासाठी नक्षलवाद्यांकडून वापरली जाणारी स्फोटके व साहित्याचा साठा पोलिसांच्या हाती लागला. हे साहित्य जमिनीत लपवून ठेवलेले असताना पोलिसांना ते हुडकून काढण्यात यश आले. त्यामुळे येत्या टीसीओस सप्ताहात घातपाती कारवाया घडवून आणण्याच्या नक्षलींच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे. ही कारवाई कुरखेडा उपविभागांतर्गत पुराडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा उपविभागांतर्गत येत असलेल्या पुराडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील मौजा जामटोला, बंजारी रिठ जंगल परिसरात कोरची एलओएस, टिपागड एलओएस व कंपनी क्र. ४ च्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांसोबत घातपात घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकासोबत बॉम्ब शोधक-नाशक पथकाचे (बीडीडीएस) जवान शोधमोहीम राबवित असताना त्यांना जमिनीत लपवून ठेवलेला स्फोटकांचा साठा मिळाला.
जिवंत कुकर बॉम्बसह इतर स्फोटके
पोलिसांच्या हाती लागलेल्या साहित्यात जिवंत कुकर बॉम्ब १ नग, कुकर ४ नग, जीवित डेटोनेटर १ नग, जिलेटिन (जेली) ४ नग, स्प्रिन्टर लोखंडी तुकडे ६ नग, गन पावडर ४५ ग्रॅम, मोबाइल चार्जर स्विच १ नग, तुटलेला मोबाइल चार्जर १ नग, एक नक्षल शर्ट व एक पॅन्ट, नक्षल पुस्तके तसेच इतर साहित्य आढळून आले. यापैकी जिवंत कुकर बॉम्ब हे बीडीडीएस पथकाच्या मदतीने यशस्वीरीत्या जागेवरच नष्ट करण्यात आला. इतर साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आले.
नक्षली कारवायांना हादरा
टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर हे स्फोटक साहित्य पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या भागात नक्षलवाद्यांसाठी हा हादरा ठरला आहे. गडचिरोली पोलीस दलाची नजर नक्षलींवर असून सामान्य नागरिकांना वेठीस धरून बळजबरीने टीसीओसी सप्ताह पाळावयास भाग पाडणे अडचणीचे ठरणार असल्याचे पोलिसांनी या कारवाईतून दाखवून दिले.