ब्रेक टेस्ट ट्रॅक अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:32 AM2018-02-05T00:32:58+5:302018-02-05T00:34:15+5:30
गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चारचाकी वाहनांची ब्रेक टेस्ट करण्यासाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून वाहनांना पासिंग देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चारचाकी वाहनांची ब्रेक टेस्ट करण्यासाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून वाहनांना पासिंग देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या जवळ उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र जमिनीबाबतचा वाद निर्माण झाल्याने ट्रॅक बनविण्याचे काम थांबले होते. गडचिरोली येथे ट्रॅक नसल्याने येथील जड वाहनांना टेस्टसाठी चंद्रपूर, भंडारा किंवा नागपूर येथे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार गडचिरोली येथील जड वाहने पासिंगसाठी चंद्रपूर, भंडारा किंवा नागपूर येथे नेली जात होती. या तिन्ही जिल्ह्यांचे अंतर गडचिरोलीपासून १०० किमीपेक्षा अधिक असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून ट्रॅकसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या जवळच ३.४० हेक्टर आर. जमीन उपलब्ध करून दिली आहे. ट्रॅक बनविण्यासाठी शासनाने ६६ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. जानेवारीपासून ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. काम अतिशय गतीने सुरू असून लवकरच काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनधारकांसाठी सोयीचे होणार आहे.
सदर ट्रॅक अत्याधुनिक पद्धतीने बनविला जात असल्याने वाहनांची ब्रेक टेस्ट अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे. जिल्ह्यातच ट्रॅक झाल्याने वाहनधारकांचा पासिंगवर होणारा अनावश्यक खर्चावर प्रतिबंध लागणार आहे. काम चांगल्या दर्जाचे व्हावे, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी स्वत: लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे काम उत्तम दर्जाचे होण्याची अपेक्षा आहे.
वाहनधारक होते त्रस्त
गडचिरोली येथे वाहनांना पासिंग देण्याचे काम बंद झाल्यानंतर वाहने चंद्रपूर, नागपूर, किंवा भंडारा येथे नेली जात होती. बºयाचवेळा वाहनाला पासिंग नसल्याचे कारण सांगून संबंधित जिल्ह्यातील वाहतूक पोलीस वाहन पकडत होते. एका दिवशी पासिंगचे काम होत नसल्याने बऱ्याचवेळा दोन ते तीन दिवस मुक्काम ठोकावा लागत होता. एखादे कागदपत्र नसल्यास वेळेवर धावपळ करावी लागत असल्याने वाहनधारक त्रस्त होते. दिवसेंदिवस चारचाकी वाहनांची संख्या वाढत चालली असल्याने शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ब्रेक टेस्ट ट्रॅक बनवून घेतले आहेत.