अर्ध्याअधिक कर्मचाऱ्यांची उशिरा एंट्री, मात्र कोणालाही ‘लेट मार्क’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:45 AM2020-12-30T04:45:43+5:302020-12-30T04:45:43+5:30

गडचिरोली : सरकारी कर्मचाऱ्यांविषयी सामान्य नागरिकांमध्ये फारसी चांगली भावना नसते. विशेषत: कामाच्या बाबतीत सरकारी अधिकारी-कर्मचारी मनमानीपणे वागतात असा सर्वसाधारण ...

Late entry of more than half of the staff, but no one has a 'late mark' | अर्ध्याअधिक कर्मचाऱ्यांची उशिरा एंट्री, मात्र कोणालाही ‘लेट मार्क’ नाही

अर्ध्याअधिक कर्मचाऱ्यांची उशिरा एंट्री, मात्र कोणालाही ‘लेट मार्क’ नाही

googlenewsNext

गडचिरोली : सरकारी कर्मचाऱ्यांविषयी सामान्य नागरिकांमध्ये फारसी चांगली भावना नसते. विशेषत: कामाच्या बाबतीत सरकारी अधिकारी-कर्मचारी मनमानीपणे वागतात असा सर्वसाधारण समज आहे. कामाचे सोडा, पण ठरवून दिलेल्या वेळेत तरी अधिकारी-कर्मचारी कार्यालयात येतात का, याची पाहणी ‘लोकमत’ने केली असता येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील लोक बरेच निर्धास्त असल्याचे दिसून आले. हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात इतरही सरकारी कार्यालयांची असण्याची शक्यता नाकारता येत नाही.शुक्रवार ते रविवार अशा सलग तीन दिवस सुट्या असल्यामुळे अनेक सरकारी कर्मचारी बाहेरगावी गेले होते. कोणी सहपरिवार गेले होते तर कोणी परिवाराला भेटायला दुसऱ्या गावी गेले होते. त्यामुळे सोमवारी वेळेत कार्यालयात पोहोचून कर्तव्यदक्षतेचा परिचय देणारे किती कर्मचारी-अधिकारी आहेत हे पाहण्यासाठी प्रतिनिधीक स्वरूपात आदिवासी प्रकल्प कार्यालयात ९.४० वाजता ‘लोकमत’ चमू पोहोचली. नियमानुसार ९.४५ वाजता कार्यालयात सर्वांनी पोहोचणे अपेक्षित होते. पण ९.५५ झाले तरी २५ टक्केही कर्मचारी-अधिकारी आले नाही. केवळ एक अधिकारी आणि वर्ग-३ चे ६, तर वर्ग-४ चे ६ कर्मचारी पोहोचले होते.

कोरोनाकाळामुळे कार्यालयातील थम्ब मशिन बंद आहे. हजेरी बुकात सह्या केल्या जातात. पण कोणत्या वेळी आले याची वेळ त्यावर नसते. त्यामुळे कितीही उशिरा आलो तरी चालून जाते, लेट मार्क तर लागतच नाही, असा विचार करून कर्मचारीही बिनधास्त झाले आहेत.

(बॉक्स)

अधिकारीही अनुपस्थित

कर्मचारीच नाही तर कार्यालयातील अधिकारी वर्गही उशिरा दाखल झाला. प्रकल्प अधिकारी असलेले आशिष येरेकर यांच्याकडे एसडीओ गडचिरोली म्हणूनही प्रभार आहे. पण इतर अधिकाऱ्यांपैकी सहायक प्रकल्प अधिकारी, कार्यालय अधीक्षकसुद्धा १०.१५ च्या नंतर कार्यालयात पोहोचले. अधिकारीच उशिरा येतील तर कर्मचाऱ्यांचा लेट मार्क कोण नोंदविणार? असा प्रश्न निर्माण होतो.

कोट

सुट्यांमुळे उशिरा आले, नेहमी होत नाही

तीन दिवसांच्या सलग सुट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांना येण्यास उशिर झाला. नेहमी असे उशिरा येत नाही. ८ जण सुटीवर आहेत तर काही अधिकाऱ्यांची जीईई, नीटच्या परीक्षेसाठी ड्युटी लागल्याने ते अनुपस्थित आहेत.

- चंदा मगर

सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन)

Web Title: Late entry of more than half of the staff, but no one has a 'late mark'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.