कायदा कागदावरच
By admin | Published: June 12, 2014 12:00 AM2014-06-12T00:00:03+5:302014-06-12T00:00:03+5:30
अल्पवयात बाल कामगाराला कामासाठी प्रवृत्त केल्याने तो शिक्षणाच्या संधी, बालसुलभ खेळ व करमणूक यापासून वंचित राहते. रात्रंदिवस काम केल्याने त्याची शारीरिक वाढ खुंटून त्याच्या व्यक्तीमत्व विकासास
समस्या : बाल कामगार
दिगांबर जवादे - गडचिरोली
अल्पवयात बाल कामगाराला कामासाठी प्रवृत्त केल्याने तो शिक्षणाच्या संधी, बालसुलभ खेळ व करमणूक यापासून वंचित राहते. रात्रंदिवस काम केल्याने त्याची शारीरिक वाढ खुंटून त्याच्या व्यक्तीमत्व विकासास अडचण निर्माण होते. एकप्रकारचे त्याचे बालपण हरवते. धोकादायक ठिकाणी काम केल्याने त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता राहते. असे झाल्यास देशाची भावी पिढी कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी १९८६ साली बालकामगार कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्यात १४ वर्षाखालील मुलाला कामावर ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र कायदा असूनही शहरात व ग्रामीण भागातसुद्धा बालकामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे बाल कामगार कायदा केवळ कागदावरच आहे, अशी टिकाही सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आजही बहुतांश मुलं चहाच्या टपरीवर ‘साहेब’ म्हणत चहा वाटत आहेत. बांधकामावर विटांची टोपली धरून तर बसस्थानकावर बुट पॉलीश करतांना बालकामगार दिसून येतात.
गडचिरोली जिल्ह्यातील स्थिती
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे बाल कामगारांची संख्यादेखील जास्त आहे. मुलगा काम करण्यालायक झाल्याबरोबर त्याचे आई-वडील त्याला काम करण्याची सक्ती करतात. विशेष करून तेंदूपत्ता हंगामात तेंदूपत्ता कंत्राटदार लहान मुलांकडून तेंदूपुडा पलटविण्याचे काम करून घेतात. गडचिरोली, देसाईगंज, चामोर्शी, आरमोरी या शहरांमध्ये असलेल्या दुकानांमध्येही बाल कामगार दिसून येतात.
कामगार कार्यालयाची कारवाई
गडचिरोली येथे स्वतंत्र सरकारी कामगार अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयाच्या अखत्यारितच बाल कामगार हा विषय येतो. या कार्यालयाने ९ फेब्रुवारी २०१२ ते ४ फेब्रुवारी २०१४ पर्यंत एकूण ९ धाडी टाकल्या असून यामध्ये १४ वर्षाखालील चार मुले आढळून आली आहेत. या दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. बाल कामगारांची संख्या लक्षात घेता, केलेली कारवाई नगण्य असल्याची टिका होत आहे.
१४ वर्षाखालील एखादा बालक स्वत:च्या दुकानात काम करीत असेल तर तो कायद्यानुसार तो बाल कामगार ठरू शकत नाही. औद्योगिकरण व शहरी करण कमी असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बाल कामगारांची संख्या कमी आहे. उन्हाळ्यात मुलांना सुटी राहत असल्याने काही मुले शहरात येऊन दुकानामध्ये नोकर राहतात. या कालावधीत बाल कामगारांची संख्या वाढते.
- प्रभाकर राऊत,
दुकान निरीक्षक, कामगार अधिकारी कार्यालय