कोतवालांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 01:26 AM2019-01-02T01:26:58+5:302019-01-02T01:27:20+5:30
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यासमोर २८ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू कले आहे. पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. कोतवाल हा इंग्रज काळापासून ते आजपर्यंत महसूल विभागाची कामे करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यासमोर २८ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू कले आहे. पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते.
कोतवाल हा इंग्रज काळापासून ते आजपर्यंत महसूल विभागाची कामे करीत आहे. तलाठ्याला सहायक म्हणून कोतवाल काम करीत आहे. कोतवाल हे महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचे पद असल्याने सहाव्या वेतन आयोगानुसार कोतवालाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू करावा, १४ हजार ९६९ रूपये पगार द्यावा आदी मागण्यांसाठी राज्यभरातील कोतवालांनी १९ नोव्हेंबरपासून तालुकास्तरावर धरणे आंदोलन करून कामबंद आंदोलन सुरू केले होते. मात्र शासनाने कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे २८ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जात आहे.
या आंदोलनात जिल्हाभरातील जवळपास ५०० कोतवाल सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कोतवाल संघटनेने दिला आहे. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्पल खेवले. सचिव विनोद दहागावकर, सर्व तालुक्यातील अध्यक्ष दीपक लिंगायत, तुळशिराम कोल्हे, रतन सहारे, विलास चांदेकर, सत्यवान भोयर, रवी करमे, शंकर मडावी, आनंद मेश्राम, रामचंद्र चंदम, यशोदास ढवळे, एकनाथ बारसिंगे हे करीत आहेत.