पुलावरील लाेखंडी कठड्यांची चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:25 AM2021-06-18T04:25:59+5:302021-06-18T04:25:59+5:30
युती शासनाच्या काळात खोब्रागडी नदीच्या करपडा घाटावर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलामुळे राज्य मार्गाला परिसरातील ५० पेक्षा ...
युती शासनाच्या काळात खोब्रागडी नदीच्या करपडा घाटावर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलामुळे राज्य मार्गाला परिसरातील ५० पेक्षा जास्त गावे जोडल्या गेली आहेत. आरमोरी-धानोरा तालुक्याची वाहतूक या पुलामुळे सुरळीत झाली. हा मोठा पूल असल्याने प्रवाशांना हाेणारा धाेका टाळण्यासाठी लोखंडी संरक्षण कठडे लावण्यात आले. पण मागील दोन-तीन वर्षांपासून मजबुतीने लावलेल्या कठड्यांचे नटबोल्ट काढून लोखंडी कठडे सतत चोरीला जात आहेत. कठडे चोरी करणारी एकादी टोळी सक्रिय असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत मागील वर्षी आरमोरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचेकडे तोंडी तक्रार करण्यात आली. पण संबंधित अधिकाऱ्याने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही किंवा संरक्षण कठडे चोरीबाबत पोलिसांत साधी तक्रारदेखील केली नाही. सद्यस्थितीत पुलावर अर्ध्यापेक्षा कमी संरक्षण कठडे बाकी आहेत. किमान ते तरी कायम राहावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कठडे चोरीला जाऊ नये यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.