अंतर्गत विरोधकांमुळे बसू शकतो नेतेंना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:24 AM2019-03-30T00:24:32+5:302019-03-30T00:26:47+5:30

कुरखेडा येथील शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्जवाटप आणि वसुलीतील दुर्लक्षामुळे निर्माण झालेली स्थिती भाजपाचे उमेदवार नेतेंसाठी अडचणीची ठरणार आहे. या पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी तेथील ठेवीदारांच्या असंतोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

The leader can sit under opposition | अंतर्गत विरोधकांमुळे बसू शकतो नेतेंना फटका

अंतर्गत विरोधकांमुळे बसू शकतो नेतेंना फटका

Next
ठळक मुद्देलढाई सोपी नाही : गटबाजी ठरणार डोकेदुखी, मोदी लाटेचा प्रभावही ओसरला

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा येथील शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्जवाटप आणि वसुलीतील दुर्लक्षामुळे निर्माण झालेली स्थिती भाजपाचे उमेदवार नेतेंसाठी अडचणीची ठरणार आहे. या पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी तेथील ठेवीदारांच्या असंतोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत घेण्यासाठी गर्दी केली होती. ते प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न झाला असला तरी विरोधक त्यावरून नेतेंना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा परिणाम मतांवर होऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यावेळी पाच उमेदवार असले तरी खरी लढत भाजपचे उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्यातच आहे. गेल्या निवडणुकीत हेच दोन प्रतिस्पर्धी आमने-सामने होते. त्यावेळी भाजपची एकजूट, मोदी लाट, नेतेंबद्दलची सहानुभूती अशा अनेक गोष्टींमुळे नेतेंचा विजय सुकर झाला होता. पण यावेळी अनेक आव्हानांना तोंड देत विजय खेचून आणणे नेते यांच्यासाठी मोठे आव्हान झाले आहे. पक्षांतर्गत विरोधकांनी निर्माण केलेल्या अडथळ्यांचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नेते यांनी उसेंडी यांचा पराभव केला होता. त्यावेळचे वातावरण आणि अनेक मुद्दे त्यांच्या पथ्यावर पडणारे होते. पहिल्यांदा २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविल्यानंतर तत्कालीन काँग्रेस उमेदवार मारोतराव कोवासे यांच्याकडून नेतेंना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती होती. लोकसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या बहुतांश जागा भाजपच्या ताब्यात नसल्या तरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील एकजुटता ही भाजपची त्यावेळी ताकद होती. त्यातच देशभरात पसरलेल्या मोदी लाटेने त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक प्रशस्त केला होता. परंतु यावेळी वातावरण मागच्या निवडणुकीप्रमाणे सकारात्मक राहिलेले नाही. प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा पक्षांतर्गत विरोधकांची टीम नेते यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
गेल्या ५ वर्षात या मतदार संघाला प्रगतीच्या वाटेवरील मोठा पल्ला गाठण्यात अपेक्षेएवढे यश आलेले नाही. मोदी लाटेचा प्रभाव यावेळी ओसरल्यात जमा आहे. त्याहीपेक्षा लोकसभा मतदार संघातील भाजपच्या ५ आमदारांपैकी किती आमदार त्यांच्यासाठी तनमनाने काम करतील याबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे.
लोकसभेसाठी नेते यांचा पत्ता कट करून आपली वर्णी लागावी यासाठी गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी प्रयत्नशील होते. त्यांना दुसऱ्या एका आमदाराचीही साथ होती. पण भाजपने नेतेंवर विश्वास टाकल्याने त्यांचा नाईलाज झाला. असे असले तरी ते आमदार एकदिलाने नेतेंसाठी कामी लागतील का? असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. एकंदरीतच यावेळच्या लढाईत सामना अतितटीचा होणार आहे. पुढच्या १०-१२ दिवसात वातावरण आपल्या बाजूने करण्यात कोण यशस्वी होतो यावरच विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

Web Title: The leader can sit under opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.