देसाईगंजची साक्षरतेत आघाडी
By Admin | Published: August 8, 2015 01:39 AM2015-08-08T01:39:06+5:302015-08-08T01:39:06+5:30
स्त्री साक्षरतेची टक्केवारी ६०.६६ : भामरागड तालुका साक्षरतेत माघारला
दिलीप दहेलकर गडचिरोली
राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करून अशिक्षीत असणाऱ्यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र असे असतानाही गडचिरोली जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी देसाईगंज तालुका साक्षरतेत आघाडीवर असून या तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ८०.७५ आहे. तर भामरागड तालुका साक्षरतेत माघारलेला असून याची टक्केवारी ४४.१६ आहे. साक्षरतेचा दर वाढविण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याचा साक्षरतेचा दर एकूण ७०.५५ टक्के आहे. यामध्ये पुरूष आघाडीवर असून पुरूषांच्या साक्षरतेची टक्केवारी ८०.२१ आहे. तर महिला साक्षरतेची टक्केवारी ६०.६६ आहे. जिल्ह्यात निरंतर शिक्षण विभागाचे स्वतंत्र कार्यालय असतानासुध्दा गडचिरोली जिल्हा साक्षरतेमध्ये पिछाडीवर असल्याचे दिसून येते. अशिक्षितांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निरंतर शिक्षण विभागाचे कार्यालय सुरू केले. साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी लाखो रूपये आतापर्यंत खर्च केले आहे. खर्चाचा विचार केला असता, गडचिरोली जिल्हा १०० टक्के साक्षर व्हायला पाहिजे होता.
मात्र जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व नियोजन शून्यतेमुळे साक्षरतेच्या बाबतीत जिल्हा मागे पडल्याची बाब समोर आली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार कुरखेडा तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ७८.८४ आहे.