गळतीच्या पाण्यावर भागविली जाते तहाण
By admin | Published: June 16, 2014 11:29 PM2014-06-16T23:29:43+5:302014-06-16T23:29:43+5:30
कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हातपंप बंद असल्याने स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा योजनेच्या गळतीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे.
वैरागड/अहेरी : कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हातपंप बंद असल्याने स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा योजनेच्या गळतीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. तर अहेरी तालुक्यातील देवलमरी येथील पाणीपुरवठा योजना मागील दोन महिन्यापासून बंद असल्याने देवलमरीवासीयांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
कढोली वॉर्ड क्रमांक ४ मध्ये जि. प. सदस्यांच्या निधीतून हातपंप मंजूर करण्यात आले आहे. मात्र उन्हाळा संपूण आता पावसाळ्याला सुरूवात झाली असतांनाही अजूनपर्यंत हातपंप खोदून देण्यात आले नाही. त्यामुळे या वार्डातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी गावातील पाणीपुरवठा योजनेच्या व्हॉल्वचे पाणी येथील नागरिक आणत आहेत. कढोली येथे निर्माण होणारी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन नदीपात्रात ज्या ठिकाणी नळ योजनेचे विहीर आहे. त्याच्या खालील भागात शिवकालीन बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला.
या बंधाऱ्याचा पाणीटंचाई निवारण्यासाठी कोणताच उपयोग झाला नाही. उलट या बंधाऱ्यामुळे नदी किणाऱ्याची फार मोठी हानी होत आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात नदी किणाऱ्यावरील माती वाहून जात असल्याने नदी पात्र रूंद होत चालले आहे. यामध्ये अनेक नागरिकांच्या जमिनी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सदर बंधारा तोडण्यात यावा, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. कढोली व खरकाडा येथे एकाचवेळी हातपंप मंजूर करण्यात आले होते. खरकाडा येथील हातपंप खोदण्यात आले. मात्र कढोली येथील हातपंप अजूनही खोदण्यात आले नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)