संघर्ष करायला शिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:25 AM2018-03-16T00:25:54+5:302018-03-16T00:25:54+5:30
स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक कसोट्या पार कराव्या लागतात. यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष करण्याची मानसिकता व ताकद महिलांनी निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी केले.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक कसोट्या पार कराव्या लागतात. यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष करण्याची मानसिकता व ताकद महिलांनी निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी केले.
नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी नगर परिषदेच्या प्रांगणात महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, महिला व बालकल्याण सभापती पूजा बोबाटे, नगर परिषद सदस्य वर्षा नैताम, रितू कोलते, लता लाटकर, अल्का पोहणकर, मंजुषा आखाडे, वैष्णवी नैताम, गीता पोटावी, वर्षा बट्टे आदी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमादरम्यान सफाई कामगार महिलांना साडीचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांसाठी १०० मीटर दौड स्पर्धा, रस्सी खेच, मटका फोड, संगीत खुर्ची, चमचा-लिंबू स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या सदस्य व शहरातील इतर महिला उपस्थित होत्या.
पुढे मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष योगीता पिपरे म्हणाल्या, महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान सुद्धा दिले जाते. या अनुदानाचा लाभ घेऊन स्वयंरोजगार स्थापन करावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमादरम्यान स्वाती काथोड, प्रगती मामिडवार, सभापती अनिता विश्रोजवार, उपसभापती रंजना गेडाम यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. एकटी महिला उद्योग करू शकत नाही, मानसिकता लक्षात घेऊनच बचतगटांची स्थापना केली आहे. बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करण्याची चांगली संधी असल्याचे मार्गदर्शन उपस्थित महिलांना केले. कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका रितू कोलते यांनी केले.