पेटतळा गाव पेसातून वगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:09 AM2017-09-08T00:09:56+5:302017-09-08T00:10:11+5:30
घोट परिसरातील पेटतळा गावात आदिवासी नागरिकांची केवळ २० टक्के लोकसंख्या असून ८० टक्के नागरिक इतर समाजाच्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : घोट परिसरातील पेटतळा गावात आदिवासी नागरिकांची केवळ २० टक्के लोकसंख्या असून ८० टक्के नागरिक इतर समाजाच्या आहेत. त्यामुळे पेटतळा ही ग्रामपंचायत पेसा कायद्यातून वगळण्यात यावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली असून याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले असल्याची माहिती ७ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
पेटतळाची ग्रामपंचायत १९६१ साली निर्माण करण्यात आली. तेव्हापासून येथील सर्वच समाजाचे नागरिक एकजुटीने राहत होते. १३ मार्च २०१४ रोजी सदर गाव पेसा अंतर्गत समाविष्ट असल्याचे परिपत्रक निघाल्यानंतर नागरिकांना आश्चार्याचा धक्काच बसला. या गावात केवळ २० टक्के आदिवासी नागरिक आहेत व ८० टक्के नागरिक इतर समाजाचे आहेत. २६ जानेवारी २०१५ रोजी ग्रामसभेत पेसा कायद्यातून ग्रामपंचायत वगळण्यात यावी, असा ठराव घेतला. २० फेब्रुवारी रोजी पुन्हा पेसा कायद्याचा ठराव बहुमताने नामंजूर करण्यात आला. २ मार्च २०१७ रोजी तेंदूपत्त्याचा लिलाव करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या उद्देशाने ग्रामसभा बोलविली होती. या सभेतही ठराव नामंजूर झाला. ८ एप्रिल २०१७ रोजी पेसा अंतर्गत तेंदूपत्ता संकलन न करता वन व्यवस्थापन समितीमार्फत तेंदूपत्ता संकलन करण्यात यावा, असा ठराव घेतला. तरीही पेसा अंतर्गत तेंदूपत्त्याचा लिलाव करून कंत्राट देण्यात आले. २४ आॅगस्ट २०१७ रोजी ग्रामसभेने पुन्हा पेटतळा हे गाव पेसातून वगळण्याबाबत ठराव घेतला. या ग्रामसभेच्या वेळी प्रोसेडींग न लिहिताच स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न सरपंच व सचिव यांनी केला. त्यामुळे या ग्रामसभेत फार मोठा तणाव निर्माण झाला होता. पेसामध्ये गाव असल्याने या गावातील ८२ टक्के नागरिकांवर अन्याय होत आहे. नागरिकांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.सदर गाव पेसापासून वगळण्यात यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेतून नागरिकांनी केली आहे. पत्रकार परिषदेला पेटतळाचे माजी सरपंच रमेश कन्नाके, वामन बर्लावार, परमेश्वर बर्लावार, मानिकराम बर्लावार, अशोक येनगंटीवार, दिलीप मुसेट्टीवार, लक्ष्मण कोसरे, तुळशीराम तुंकलवार, विशाल बोल्लीवार, लसमा चौधरी, गंगाधर तुंकलवार, गोविंदराव मोहुर्ले, आनंदराव चौधरी, संभांजी तुंकलवार, पूजा शेट्टीवार, भारती बर्लावार, यामिनी तुंकलवार, लोकीता तुंकलवार, गयाबाई अंबेलवार, हिवराज गोटेवार उपस्थित होते.