वंचितांना कर्जमाफीचा लाभ देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:26 AM2018-12-22T01:26:08+5:302018-12-22T01:27:03+5:30

विद्यमान राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेऊन यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.

Lending benefits to the taxpayers | वंचितांना कर्जमाफीचा लाभ देणार

वंचितांना कर्जमाफीचा लाभ देणार

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्र्यांची ग्वाही : गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सवाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यमान राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेऊन यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. मात्र अद्यापही अनेक पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व तालुकास्तरावर शिबिर घेऊन अडीअडचणी मार्गी लावणार, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली.
आत्मा, कृषी विभाग जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवशीय कृषी व गोंडवन महोत्सव २०१८ चे उद्घाटन स्थानिक कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणावर शुक्रवारी झाले. यावेळी उद्घाटक म्हणून पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, डीआरडीचे प्रकल्प संचालक कुणाल उंदीरवाडे, जि.प. सभापती माधुरी उरेते, नगरसेवक प्रमोद पिपरे, जि.प. सदस्यद्वय निता साखरे व प्रा.रमेश बारसागडे, नागपूरच्या कृषी सहसंचालक प्रज्ञा गोरघाटे, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापक चेतना लाटकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री आत्राम म्हणाले, जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे आवश्यक आहे. शेतकºयांच्या प्रगतीवरच जिल्ह्याचा विकास अवलंबून आहे. विद्यमान सरकारने शेतीला समृध्द करण्यासाठी सिंचनावर भर दिला आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर योजना, शेती औजारे वाटप आदीसह विविध योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनांचा लाभ शेवट्याच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाºयांनी प्रयत्न केले पाहिजे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात लाखो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली आहे. सर्वात मागास व कृषी प्रधान गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रगती करण्याची जबाबदारी राज्य शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेवर टाकली असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले, शेतकऱ्यांनी धान शेतीसोबतच मत्स्य, दुग्ध व इतर जोडव्यवसाय केले पाहिजे. कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी सदर कृषी महोत्सवात येऊन आपल्या अडीअडचणी मांडाव्यात. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे डॉ. होळी यांनी सांगितले. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, सीईओ डॉ. विजय राठोड यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी तर आभार डीआरडीचे प्रकल्प संचालक कुणाल उंदीरवाडे यांनी मानले. सदर महोत्सवाला भाजपचे पदाधिकारी अनिल करपे, दिलीप चलाख, सुरेश शहा यांच्यासह जिल्हाभरातील हजारो शेतकरी, बचत गटांच्या महिला, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर महोत्सवादरम्यान ड्रोन कॅमेराची व्यवस्था करण्यात आली होती. शामियानाही प्रशस्त उभारण्यात आला आहे.

चांगले करणाऱ्यांकडून प्रेरणा घ्या
शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम होणे काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकºयांनी नवीन तंत्रज्ञान, नवीन पीक पध्दती स्वीकारली पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला बारमाही पाणी उपलब्ध होण्यासाठी सरकारनेही पावले उचलली आहेत. शेतकरी व बचत गटातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम झाल्याशिवाय गडचिरोली जिल्ह्याचा विकास होणार नाही. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी व महिलांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. उत्कृष्ट कामगिरी करणाºयांकडून इतर शेतकरी व महिलांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री आत्राम यांनी केले.

उत्कृष्ट कामगिरी करणाºया शेतकऱ्यांचा गौरव
सदर कृषी व गोंडवन महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाºया अनेक शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाला उभारी देणाऱ्या कर्तबगार महिलांचाही सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये शेतकरी मोरेश्वर चरडे, मुरारी बोरकर, आनंदराव उसेंडी, मनिराम झाडे, तिलक सोनवानी, तसेच लक्ष्मी बोरधरे, अ‍ॅड. बाळकृष्ण बांबोळकर, योगेश धोटे, सोमा पिळसे, नितेश मुलकरी, चिन्ना वाचामी व गंगाराम भोयर आदींचा समावेश आहे.

प्रदर्शनीत विविध स्टॉल ठरले आकर्षण
२५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या कृषी व गोंडवन महोत्सवाच्या प्रदर्शनीत महिला बचत गट, आत्मा, नगर परिषद, विविध विभाग तसेच माविम तर्फे एकूण ३०० स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये कृषी विभागाची नवनवीन पीक पध्दती, शेती सिंचन, तसेच पशुसंवर्धन विभागातर्फे पशुंची माहिती देणारे स्टॉल आहेत. महिला बचत गटांतर्फे विविध खाद्य पदार्थ, वनौषधी, यंत्र व इतर वस्तूंचे स्टॉल लावले आहेत. पालकमंत्र्यांनी उद्घाटनानंतर कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या स्टॉल्सची पाहणी करून माहिती जाणून घेतली. याशिवाय महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन महिलांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, सदर महोत्सवात लागलेल्या प्रदर्शनीतील अनेक स्टॉल आकर्षण ठरले आहेत.

Web Title: Lending benefits to the taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.