कोरेगावातील थरार! ‘तो’ चोरपावली आला अन् कोंबड्याऐवजी वृद्धावरच केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 10:23 PM2022-09-29T22:23:36+5:302022-09-29T22:25:26+5:30

घरात चोरपावली प्रवेश करून कोंबड्याऐवजी खाटेवर झोपून असलेल्या इसमावर बिबट्याने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले.

leopard attack in koregaon gadchiroli | कोरेगावातील थरार! ‘तो’ चोरपावली आला अन् कोंबड्याऐवजी वृद्धावरच केला हल्ला

कोरेगावातील थरार! ‘तो’ चोरपावली आला अन् कोंबड्याऐवजी वृद्धावरच केला हल्ला

googlenewsNext

गोपाल लाजुरकर

जोगीसाखरा (गडचिरोली) : निद्राधीन व्यक्ती अकार्यक्षम राहतो. संवेदना जागृत राहिल्या तरी तो प्रतिकार करण्यास सक्षम नसतो. झोपेत असताना केव्हा काय होईल, याची किंचितही कल्पना नसते. निद्रानाश करणारी अनेक संकटे रात्री ओढवतात. असेच काहीसे संकट आरमोरी तालुक्याच्या कोरेगाव येथील एका वृद्धावर गुरूवारच्या मध्यरात्री ओढवले. घरात चोरपावली प्रवेश करून कोंबड्याऐवजी खाटेवर झोपून असलेल्या इसमावर बिबट्याने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले.

पणतू उसेंडी (वय ७०) रा. कोरेगाव (रांगी) असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. उसेंडी हे आपल्या घरी नेहमीप्रमाणे घरचा दरवाजा लावून झोपले होते. त्यांच्या घरापासून दोन घरे ओलांडल्यानंतर शेती आहे. उसेंडी हे गाढ झोपेत असताना गुरूवारच्या मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास बिबट्याने पुढील बाजूने घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; परंतु दरवाजा उघडला नाही. तेव्हा बिबट्याने घराच्या मागील बाजूच्या पडक्या भिंतीवरून प्रवेश केला. उसेंडी यांच्या जवळपास त्यांची पत्नी होती व लगत एक कोंबडा बांधला होता. 

बिबट्याची चाहुल लागताच कोंबड्याने गोंगाट केला तेव्हा उसेंडी हे खडबडून जागे झाले, परंतु त्याचवेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून चेहरा व मानेवर ओरबडले. ही बाब माहीत होताच कुटुंबातील अन्य लोकांनी आरडाओरड करीत उसेंडी यांच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. सदर घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. उसेंडी यांच्या चेहऱ्यावर खोलवर जखमा झाल्या असून मानेवरही पंजा रुतल्याने घाव पडले. त्यांना सुरूवातीला आरमोरी उप जिल्हा रुग्णालयात त्यानंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले असून प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे, आदल्या दिवशीही बिबट्याने उसेंडी यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता; कोंबड्या खाण्याच्या उद्देशाने बिबट्या गावात आला असावा, असे लोकांचे म्हणणे आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष आता गावातही?

मानवाने जंगलावर अतिक्रमण केल्याने व जंगलात हस्तक्षेप वाढविल्याने वन्यप्राण्यांचे मानवावरील हल्ले वाढले, असे वनविभागाकडून सांगितले जाते; परंतु आता गावात आणि चार भिंतीच्या आत बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांचे हल्ले वाढत आहेत. बिबट्याने घरात शिरून केलेला हा हल्ला जंगलालगतच्या गावकऱ्यांची झोप उडवून देणारा आहे.
 

Web Title: leopard attack in koregaon gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.