वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, वनविभागाकडून अंत्यविधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 09:24 PM2019-06-07T21:24:15+5:302019-06-07T21:25:18+5:30
वाहन पसार : कोंढाळा जळील घटना
देसाईगंज (गडचिरोली) : आरमोरी मार्गावरील कोंढाळा बिटांतर्गत येणाºया जंगलातील मार्गावर बुधवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट ठार झाला. याबाबात माहिती मिळताच, वन विभागाने अत्यंत गोपनीय पद्धतीने बिबट्याचा अंत्यविधी केला.
देसाईगंज-आरमोरी मार्गावर कोंढाळा पासून जंगल सुरू होते. या जंगलातच जवळपास 12 महिने वयाच्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहन पसार झाले. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी बिबट्या ठार झाल्याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळ गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणी केली व अंत्यविधी पार पाडण्यात आला. वन्यजीवन मित्राला न बोलविताच उत्तरीय तपासणी करण्यात आली. बिबट्याच्या अपघाताबाबत कोंढाळा बिटाचे वनरक्षक नंदेश्वर यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता, बिबट्याचा अपघात झाल्याचे मान्य केले. रात्रीच सर्वच सोपस्कार आटोपण्यात आल्याचीही कबुली दिली. छायाचित्राबाबत विचारणा केली असता, वरिष्ठांकडे बोट दाखविले. बिबट्याचा मृत्यूचे प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने वन विभाग कमालीची गोपनियता पाळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.