आरमोरी वनपरिक्षेत्रात बिबट्या आढळला मृतावस्थेत; वाघाशी झालेल्या झुंजीत ठार झाल्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 02:39 PM2023-02-10T14:39:52+5:302023-02-10T14:41:25+5:30

मृत बिबट्या अंदाजे चार वर्षे वयाचा

Leopard found dead in Armory forest area; Presumed to have been killed in a fight with a tiger | आरमोरी वनपरिक्षेत्रात बिबट्या आढळला मृतावस्थेत; वाघाशी झालेल्या झुंजीत ठार झाल्याचा अंदाज

आरमोरी वनपरिक्षेत्रात बिबट्या आढळला मृतावस्थेत; वाघाशी झालेल्या झुंजीत ठार झाल्याचा अंदाज

Next

आरमोरी (गडचिरोली) : आरमोरी वनपरिक्षेत्रातील आष्टा ते कासवी मार्गावरील आष्टा कालव्यालगतच्या परिसरात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. वाघ आणि बिबट्या यांच्या झुंजीत त्या बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने चार ते पाच दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

परिसरातील रवि नियतक्षेत्राचे वनरक्षक अजय उरकुडे हे ८ फेब्रुवारीला संध्याकाळी गस्तीवर असताना आष्टा ते कासवी मार्गालगत असलेल्या कक्ष क्रमांक ५६ मधील कालव्याजवळ कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह पडला असल्याचे निदर्शनास आले. हा बिबट्या अंदाजे चार वर्षे वयाचा होता. या घटनेची माहिती वनरक्षक अजय उरकुडे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गर्शनाखाली मृत बिबट्याचे तिथेच शवविच्छेदन करून नंतर दहन करण्यात आले.

यावेळी वडसाचे सहायक वनसंरक्षक धनंजय वायभासे, सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम, क्षेत्र सहायक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक अजय उरकुडे, वन्यजीव अभ्यासक देवानंद दुमाने, वनपाल एस. पी. तिजारे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुकारे, डॉ. कोरोने उपस्थित होते.

वाघिणीच्या पाऊलखुणा आढळल्या

त्या घटनास्थळाच्या परिसरात टी-२ या वाघिणीचे अस्तित्व असून चार ते पाच दिवसांअगोदरच्या त्या वाघिणीच्या पाऊलखुणा घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर आढळून आल्या आहेत. त्यामुळे वाघ आणि बिबट्या यांच्यात झुंज होऊन त्यात बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा वन विभागाचा अंदाज आहे.

Web Title: Leopard found dead in Armory forest area; Presumed to have been killed in a fight with a tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.