आठ फुटांची भिंत पार करत बिबट्याने मारल्या १५ शेळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:43 AM2021-09-17T04:43:53+5:302021-09-17T04:43:53+5:30
देसाईगंज तालुक्यातील बोडधा ग्रामपंचायतअंतर्गत रावणवाडी आणि रावणवाडी टोली ही दोन गावे येतात. या दोन गावांत चार किलोमीटरचे अंतर आहे. ...
देसाईगंज तालुक्यातील बोडधा ग्रामपंचायतअंतर्गत रावणवाडी आणि रावणवाडी टोली ही दोन गावे येतात. या दोन गावांत चार किलोमीटरचे अंतर आहे. बुधवारच्या मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास प्रभू नैताम यांच्या गोठ्यात बिबट्याने भिंतीवरून प्रवेश केला. यावेळी गोठ्यात बांधून ठेवलेल्या अकरा शेळ्या बिबट्याने ठार केल्या. ४ जंगलात पळवून नेल्या, त्यात तीन बोकडांचा समावेश आहे. हा प्रकार सकाळच्या सुमारास लक्षात आला.
या घटनेत प्रभू नैताम यांचे ८० ते ९० हजारांचे नुकसान झाले. त्यांना वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाने कोरेगाव चौक, डोंगरमेंढा टोली परिसरातील नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे. वनविभागाने योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
(बॉक्स)
एकापेक्षा जास्त बिबट्याची शक्यता
आठ फुटाची संरक्षक भिंत ओलांडून गोठ्यातील चार शेळ्या बिबट्याने पळविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच एकाच वेळी १५ शेळ्या बिबट्याने मारण्याचा प्रकारही आश्चर्यात टाकणारा आहे. यावरून हल्ला करणारा एकच बिबट्या नसून जास्त संख्येने असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच क्षेत्र सहायक कलवार कानकाटे, रावणवाडीच्या वनरक्षक कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
(कोट)
या परिसरात बिबट्याचा वावर आहे. वनकर्मचाऱ्यांची गस्त लावलेली आहे. नागरिकांनी जंगलात एकट्याने फिरू नये. वनखात्याला सहकार्य करावे.
- विजय धांडे
वनपरिक्षेत्राधिकारी, वनविभाग, देसाईगंज