गडचिरोलीच्या जंगलात बिबट आढळला मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:34 PM2021-09-24T16:34:59+5:302021-09-24T16:35:39+5:30
गडचिरोली वनविकास महामंडळाच्या जंगलात एक बिबट मृतावस्थेत आढळला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
गडचिरोली : मानव-वन्यजीव संघर्षात गडचिरोली जिल्ह्यात अलिकडे वाघ आणि बिबट्यांचा धुमाकूळ सुरू असताना एक बिबट मृतावस्थेत आढळला आहे. महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) हद्दीत मृत बिबट आढळला असून त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे गूढ निर्माण झाले आहे.
हा बिबट गुरुवारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मृतावस्थेत दिसला. परंतू तो एफडीसीएमच्या कंपार्टमेंट नंबर १४३ मध्ये मारकबोडी या गावापासून काही अंतरावर होता. त्यामुळे निरोप मिळताच एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. देसाईगंज येथे आज (शुक्रवारी) त्या बिबट्याचे शवपरिक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
बिबट्याचे सर्व अवयव शाबुत आहेत. त्यामुळे अवयव विक्रीसाठी त्याची शिकार झाली असण्याची शक्यता नाही. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे त्याला मारण्यासाठी कोणी विषप्रयोग तर केला नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.