वाघांच्या भीतीने बिबट्यांची गावांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:19 AM2020-12-28T04:19:22+5:302020-12-28T04:19:22+5:30
वाघ बिबटल्यालाही आपल्या परिसरात राहू देत नाही. वाघाच्या तुलनेत बिबट हा कमी शक्ती असलेला प्राणी असल्याने वाघ बिबटल्यावर हल्ला ...
वाघ बिबटल्यालाही आपल्या परिसरात राहू देत नाही. वाघाच्या तुलनेत बिबट हा कमी शक्ती असलेला प्राणी असल्याने वाघ बिबटल्यावर हल्ला करते. त्यामुळे बिबट वाघाच्या हद्दीत शिरकाव करीत नाही. आजपर्यंत वाघ नसल्याने बिबटे जंगलात राहत हाेते. आतामात्र वाघांनी जंगलाचा ताबा घेतल्याने बिबटे असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे ते आता गावाजवळच्या सीमेत राहत आहेत. वाघ हा सहजासहजी गावात येत नाही. त्यामुळे गावाजवळ राहणे बिबटे स्वत:ला सुरक्षित समजत आहेत. दिवसभर गावाजवळ राहून रात्री गावातील पाळीव जनावरे, काेंबड्या, बकऱ्या यांच्यावर हल्ले करीत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
बाॅक्स .......
नागरिकांनी राहायचे कुठे?
अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागून आहेत. रस्तेसुद्धा जंगलातूनच जातात. पाळीव जनावरे चारण्यासाठी जंगलात जावेच लागते. जंगलात गेल्यास वाघाचा हल्ला हाेत आहे. तर गावात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे हल्ले हाेत असल्याने गावातही राहणे आता असुरक्षित झाले आहेत. जंगलालगत असलेल्या गावांमधील नागरिक सायंकाळ हाेताच दरवाजे बंद करून राहत आहेत. वाघ व बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महिनाभराच्या कालावधीत वाघांनी तीन नागरिकांचा तर बिबट्याने एकाचा बळी घेतला आहे. ज्या घरचा व्यक्ती मृत्यू पावते त्या कुटुंबाच्या वेदना त्या कुुटुंबालाच कळतात, अशी भावना पीडित कुटुंब व्यक्त करतात. त्यामुळे वन विभागाने वाघांचा बंदाेबस्त करणे आवश्यक आहे.
बाॅक्स ......
चांभार्डात सलग दाेन दिवस बिबट्याचा हल्ला
गडचिराेली तालुक्यातील अमिर्झा परिसरात असलेल्या जंगलात वाघ आहेत. त्यामुळे बिबट्यांनी आता गावाकडे धाव घेतली आहे. शुक्रवारी रात्री चांभार्डा टाेली येथील पाच नागरिकांच्या घरातील १० ते १२ काेंबड्या फस्त केल्या. त्यानंतर शनिवारी रात्री ९.१० वाजताच्या सुमारास ग्राम पंचायतजवळ असलेल्या जाेतिबा उईके यांच्या घरच्या काेंबड्यांवर ताव मारला. त्यानंतर काही वेळाने सूरज उईके यांच्या गाेठ्यातील वासरावर हल्ला करून जखमी केले. आठ दिवसांपूर्वी टेंभा येथे आठवडाभर बिबट्याने धुमाकुळ घातला हाेता. या सर्व घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.