व्यसनमुक्तीचे धडे
By admin | Published: November 22, 2014 11:02 PM2014-11-22T23:02:26+5:302014-11-22T23:02:26+5:30
आरमोरी पंचायत समिती अंतर्गत आरमोरी व डोंगरगाव केंद्रातील शिक्षकांचे जि. प. केंद्र प्राथमिक शाळा आरमोरी येथे एक दिवसीय व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात
आरमोरी : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत आरमोरी व डोंगरगाव केंद्रातील शिक्षकांचे जि. प. केंद्र प्राथमिक शाळा आरमोरी येथे एक दिवसीय व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शिक्षकांना अध्यापनातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे देण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती चंदू वडपल्लीवार होते तर उद्घाटक म्हणून पंचायत समितीच्या सभापती सविता भोयर उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून भाग शिक्षणाधिकारी पितांबर कोडापे, नरोटे, प्राचार्य साईनाथ अद्दलवार, डॉ प्रकाश बंडीवार, केंद्रप्रमुख शंकर बोरकर , गोपीनाथ नेवारे उपस्थित होते. या शिबिरादरम्यान चंदू वडपल्लीवार यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आपल्या जिल्ह्यात दारूबंदी होऊन २० वर्ष झाले, परंतु याचा उलट परिणाम झाला. तरुणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच महाराष्ट्रात गुटखा बंदी केली आहे परंतु ९० टक्के तरुण गुटखा, खर्राच्या आहारी गेला आहे. त्यामुळे यावर उपाययोजना केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. पितांबर कोडापे यांनी वाईट व्यसनांची कारणे कोणती आहेत यावर मार्गदर्शन केले, डॉ प्रकाश बंडीवार तंबाखू, गुटखा, खर्रा यामुळे तोंडाचे, गळ्याचे कोणते आजार होतात याविषयी प्रत्यक्ष प्रोजेक्टवर स्लाईडद्वारे मार्गदर्शन केले , यावेळी शंकर बोरकर यांनी वाईट व्यसनाचे शरीरात पंधरा रोग कोणते होतात हे कोडे सोडवा या उपक्रमातून सांगितले. तसेच व्यसनमुक्तीचे शाळेत कोणते उपक्रम घ्यायचे याबाबत मार्गदर्शन केले या शिबिराला आरमोरी व डोंगरगाव केंद्रातील शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक शंकर बोरकर, संचालन अविनाश वऱ्हाडे यांनी तर आभार गोपीनाथ नेवारे यांनी मानले.