बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिले धान लागवड व व्यवस्थापनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:38 AM2021-07-30T04:38:09+5:302021-07-30T04:38:09+5:30
शेतीशाळेत कृषी सहायक किशोर भैसारे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन, निरोगी व सशक्त पीक जोपासणे, मित्र किडीचे संवर्धन ...
शेतीशाळेत कृषी सहायक किशोर भैसारे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन, निरोगी व सशक्त पीक जोपासणे, मित्र किडीचे संवर्धन करणे, संतुलित खताचा वापर, याबाबत मार्गर्शन केले. थाटरी येथे आतापर्यंत चार शेतीवर्ग पार पडले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना भात लागवड, श्री पद्धत, पट्टा पद्धत, चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञान, सगुना भात लागवड तंत्रज्ञान यावर सविस्तर माहिती दिली. रोपांची पुनर्लागवड आणि खत नियोजनायाकरिता धान रोपांची शिफारशीनुसार लागवड करावी तसेच योग्य खतमात्रा द्यावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.
जमिनीत रासायनिक खतांचा वापर कमी करण्याकरिता शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचे प्रकार, त्यातील घटक, निरनिराळे हिरवळीचे खत व त्यापासून उपलब्ध होणारे अन्नद्रव्य, सुपिकता पातळीनुसार पिकासाठी प्रती हेक्टर खताची मात्रा निश्चित करणे, रासायनिक खतांची मात्रा निश्चित करताना गुणोत्तराचा वापर करून खताची मात्रा काढणे, सूक्ष्म मूलद्रव्यांची धान पिकाकरिता आवश्यकता याबाबीवर कृषी सहायक किशोर भैसारे यांनी मार्गदर्शन केले. शेतीशाळेला पोलीस पाटील राकेश उसेंडी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र उसेंडी, प्रगतशील शेतकरी शंकर आतला, कृषी मित्र अजय उसेंडी व शेतकरी उपस्थित होते.
बाॅक्स
दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक
वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागापासून दशपर्णी अर्क तयार करून त्याद्वारे कीड व रोगाचे प्रमाण काही अंशी आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवता येते. यासाठी लागणाऱ्या वनस्पतीचा पाला जवळच्या परिसरात सहज उपलब्ध होतो, अर्क तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी असल्याने सर्वसामान्य शेतकरी घरच्या घरी दशपर्णी अर्क तयार करू शकतो. वनस्पतीमधील नैसर्गिक रसायनामुळे अळ्या व बुरशी यांच्या वापराने नियंत्रणात येतात. बाजारातील कीटकनाशकांवर होणार खर्च तसेच पीक उत्पादन खर्च कमी होतो व पर्यावरण चांगले ठेवण्यास मदत होते. कर्मचाऱ्यांनी दशपर्णी अर्क कसा तयार करावा, याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवून त्याची उपयोगिता शेतकऱ्यांना सांगितली.
290721\img-20210729-wa0079.jpg
शेतीशाळेचे रोवणी प्रात्यक्षिक