सुविधांअभावी कोठी आश्रमशाळेकडे विद्यार्थ्यांची पाठ
By admin | Published: August 14, 2015 01:47 AM2015-08-14T01:47:22+5:302015-08-14T01:47:22+5:30
नक्षलग्रस्त व जंगलाने व्यापलेल्या भामरागड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, ....
गडचिरोली : नक्षलग्रस्त व जंगलाने व्यापलेल्या भामरागड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने तालुक्यातील कोठी येथे आश्रमशाळेची प्रशस्त इमारत बांधली. मात्र या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. त्याचबरोबर शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी परिसरातील विद्यार्थ्यांनी या आश्रमशाळेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या दिवसंदिवस कमी होत आहे.
कोठी हे गाव भामरागड मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर आहे. कोठी परिसरातील गावे आदिवासीबहुल असून रस्त्यांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अडचण निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने कोठी येथे आश्रमशाळा उघडण्यास मान्यता दिली. काही वर्षांपूर्वी कोठी येथे कोट्यवधी रूपये खर्चुन आश्रमशाळेची प्रशस्त इमारत बांधण्यात आली. मात्र या इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते.
शाळेच्या परिसरात तीन हातपंप खोदण्यात आले आहेत. पाण्यासाठी पाण्याची टाकी बनविण्यात आली आहे. परंतु तिचा अजूनपर्यंत वापर सुरू झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना हातपंपाचेच पाणी आणावे लागते. शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम मागील चार वर्षांपासून अर्धवट सोडण्यात आले आहे. संरक्षण भिंतीअभावी आश्रमशाळा परिसरात मोकाट जनावरे व डुकरांचा रात्रंदिवस वावर राहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी संसर्गजन्य रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मागील वर्षी याच शाळेतील दोन मुलांचा आजाराने मृत्यू झाला होता. याविरोधात पालकांनी आंदोलन उभारले होते. त्यावेळी मुख्याध्यापक व अधीक्षकांवर निलंबित होण्याची पाळी आली होती. मुलींकरिता १० शौचालये असली तरी त्यातील दोनच शौचालये सुरू आहेत. बाकी संपूर्ण शौचालय चोकअप झाली आहेत. त्यामुळे मुलींची मोठी गैरसोय होत असून शौचासाठी बाहेर जावे लागते. एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेच्या परिसरात सोलर वॉटर हिटर भंगारामध्ये जमा झाले आहे.
या सर्व असुविधांमुळे कोठी परिसरातील विद्यार्थी या आश्रमशाळेकडे पाठ फिरवित चालले आहेत. पालकवर्ग आपल्या पाल्यांना कन्हाळगाव व इतर आश्रमशाळांमध्ये पाठवित आहेत. परिणामी या आश्रमशाळेत सध्य:स्थितीत केवळ ३५० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांचेही भविष्य अंधकारमय झाले आहे.
आश्रमशाळेच्या परिस्थितीबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडचे प्रकल्प अधिकारी रामचंद्र सोनकवडे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी १३ आॅगस्ट प्रस्तूत प्रतिनिधीने कार्यालयाला भेट दिली असता, प्रकल्प अधिकारी उपस्थित नव्हते. दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.