रेल्वे लवकर येऊ द्या जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:10 AM2019-04-05T00:10:38+5:302019-04-05T00:11:03+5:30
गडचिरोली विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विहीरगाव मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात नागरिकांना बोलते केले. एक-एक लोक बोलायला लागले तेव्हा अनेक जण आपले म्हणणे मांडण्यासाठी पुढे सरसावले.
गडचिरोली ते विहीरगाव
१५ किमी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विहीरगाव मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात नागरिकांना बोलते केले. एक-एक लोक बोलायला लागले तेव्हा अनेक जण आपले म्हणणे मांडण्यासाठी पुढे सरसावले.
‘गडचिरोलीले रेल्वे लवकर येऊ द्या जी, पोरायले धंदापाणी तरी काई करता येईल. रेल्वे आली तर माल स्वस्तात भेटन जी. मंजूर झाली समजलं आमाले, पण लवकर आली पायजे’, अशी भावना विहिरीगावच्या सुरेखा नवघरे, दामोधर चुधरी या जागरूक नागरिकांनी व्यक्त केली.
अगोदरच्या सरकारमध्ये आणि आताच्या सरकारच्या कामगिरीची तुलना कशी कराल? असे विचारले असता चुधरी म्हणाले, आता काँग्रेस सरकारने एवढे दिवस राज केलेच ना, मग १० वर्ष या सरकारला करू द्या. काही फरक नाही दिसला तर पुढच्या निवडणुकीत देऊ झटका. पण यावेळी अजून त्यांना चान्स दिला पाहीजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मेंढ्याचे हरिदास दाणे म्हणाले, मोदींचे काम सरस आहे. पण जिल्ह्यातल्या एसटी आरक्षणाने बाकी प्रवर्गातील लोकांवर अन्याय होत आहे. तो दूर केला पाहीजे. भाग्यश्री सिडाम या युवतीने स्कॉलरशिप मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एकूणच या प्रवासात गावाकडील लोक जागरूकता असल्याचे दिसले.
स्थानिक मुद्देच महत्त्वाचे
गावकडच्या सोयी महत्वाच्या आहेत. ग्रामीण भागातील लोकांना रस्ते, पूल, पाणी, स्थानिक लोकांच्या हाताला काम या समस्या महत्वाच्या असतात. राष्ट्रीय स्तरावर कायम घडामोडी होतात हे तर आम्हाला समजतही नाही. आमच्या गावाचा, परिसराचा विकास म्हणजेच आमच्यासाठी सर्वकाही आहे. गावाकडे समस्या असल्या तरी आता त्या सुटत आहे, असे अनेकांनी सांगितले.