चला, व्यसनाला बदनाम करू!
By admin | Published: January 2, 2016 08:34 AM2016-01-02T08:34:48+5:302016-01-02T08:34:48+5:30
युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याने सुजाण व व्यसनमुक्त समाज निर्मितीस अडथळा येत आहे. युवा
गडचिरोली : युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याने सुजाण व व्यसनमुक्त समाज निर्मितीस अडथळा येत आहे. युवा व्यसनांच्या आहारी गेल्यास केवळ वैयक्तिकच नाही तर समाजाचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे व्यसनांच्या दुष्परिणामांची जनजागृती शुक्रवारी शहरात रॅलीद्वारे नववर्षाच्या निमित्ताने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी अंनिसच्या नेतृत्त्वात ‘चला व्यसनाला बदनाम करू’ अशा घोषणा देत व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश दिला.
नवीन वर्ष सुख, समृद्धीचे जावे, आजचे व्यसनाधीन युवक योग्य मार्गाला लागावेत या हेतूने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सर्वाेदय मंडळ, अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समिती, अण्णा हजारे विचारमंचच्या पुढाकारातून सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत श्री गुरूदेव प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. इंदिरा गांधी चौकातून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गांनी रॅली काढून व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प नागरिकांनी करावा, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
रॅलीत गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, श्री गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, मुरलीधर बद्दलवार, पंडित पुडके, रोहिदास राऊत, प्रा. देवानंद कामडी, संदीप कांबळे, पी. बी. ठाकरे तसेच विविध कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीच्या समारोपानंतर मार्गदर्शन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)