सुरजागडवरील संपत्तीचे रक्षण करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:00 AM2017-11-16T01:00:53+5:302017-11-16T01:02:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील सूरजागड पहाडीच्या परिसरातून लीज देण्यात आलेल्या लॉयड अॅण्ड मेटल कंपनीकडून उत्खननाचे काम सुरू आहे. या उत्खननादरम्यान खनीज व वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात जनहितवादी युवा समिती व ग्रामसभांच्या वतीने शासनस्तरावर अनेक निवेदन देऊन होत असलेल्या नुकसानीबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र याबाबत कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता या भागातील ग्रामसभाच पहाडीच्या परिसरातील खनिज व वनसंपत्तीचे संरक्षण करणार असल्याचे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात जनहितवादी युवा समितीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, पेसा कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील तेंदू, बांबूसह इतर गौण वनोपजाची मालकी ग्रामसभा तसेच पंचायतीकडे विहित करण्यात आली आहे. शासनाकडून ग्रामसभांना या गौण वनोपजावरील हक्क प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार कापणी, संकलन, विक्री, व्यवस्थापन व संवर्धनाचे संपूर्ण अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. मात्र सूरजागड लोह पहाडीवरील उत्खननादरम्यानच्या कामात ग्रामसभांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामसभांच्या संपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा ग्रामसभा सामूहिकरित्या संपत्तीचे रक्षण करणार, असे म्हटले आहे.