पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करू
By admin | Published: May 30, 2016 01:25 AM2016-05-30T01:25:09+5:302016-05-30T01:25:09+5:30
राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहमदनगर जिल्ह्यात दौरा करून तेथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.
अम्ब्रीशराव आत्राम यांची ग्वाही : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा
गडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहमदनगर जिल्ह्यात दौरा करून तेथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान त्यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली व जलसंधारण योजनांबाबत आत्राम यांनी अण्णा हजारे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. दरम्यान पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली.
दरम्यान राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अण्णा हजारे यांच्या समावेत मसने येथे जाऊन नाला खोलीकरणाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जि. प. सदस्य विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, सुभाष दुधाडे, सरपंच नीलम बालवे, झरेकर आदी उपस्थित होते.
पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी गावात नवी पाणी योजना देण्यात यावी, अशी मागणी सरपंच नीलम बालवे व झरेकर यांनी राज्यमंत्र्यांकडे केली. बाबुर्डी येथील बंधाऱ्याच्या कामाची पाहणी त्यांनी केली. दरम्यान यावेळी येथील ग्रामस्थांनी पाण्याबाबत राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन राज्यमंत्री आत्राम यांनी बीडीओ किशोर काळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. (स्थानिक प्रतिनिधी)