परवाना शिबिर गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:32 AM2021-03-22T04:32:57+5:302021-03-22T04:32:57+5:30

एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूक विषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले ...

License camp needs | परवाना शिबिर गरज

परवाना शिबिर गरज

Next

एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूक विषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टर चालकांसाठी परवाना शिबिर भरविण्याची गरज आहे.

अनावश्यक फलके हटवा

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणाला बाधा येत आहे. त्यामुळे सदर फलक हटविण्याची मागणी आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लाहेरीत नवीन आराेग्य केंद्राची इमारत बांधा

भामरागड : तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी आहे.

विजेचा लपंडावाने नागरिक त्रस्त

गडचिरोली : सततच्या विजेच्या लपंडावामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. दिवसातून आठ ते दहा वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गडचिरोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये ही समस्या आहे.

मातीच्या बांधाचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी

आलापल्ली : वन विभागातर्फे दोन वर्षापूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळ खात पडला आहे. मातीचे बंधारे निर्माण करण्याची गरज आहे.

निवाऱ्याअभावी हाल

धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याचे अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नवीन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मोकाट कुत्र्यांमुळे त्रास

एटापल्ली : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेक वेळा नगर पंचायतीकडे केली आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.

पांदण रस्ते अतिक्रमणात

घोट : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदन रस्ता म्हटले जाते. या पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोच्या माध्यमातून बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.

तंमुसला प्रशिक्षण द्या

रांगी : अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तंटामुक्त समित्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. प्रशिक्षण दिल्यास भांडण व तंटे याेग्य प्रकारे साेडविण्यास मदत हाेईल.

लाभ मिळण्यास दिरंगाई

आलापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही.

वास्तूची दुरुस्ती करा

सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. अनेक वर्षांपासून मागणी केली जात असतानाही दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

दत्तमंदिरात सुविधा द्या

आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे प्राचीन काळापासून दत्ताचे आहे. मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष असून मंदिर परिसरात सोयी-सुविधा देण्याची मागणी होत आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

दुग्ध योजना राबवा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ७५ पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र त्यातील ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. त्यामुळे दुग्ध याेजना राबवावी.

Web Title: License camp needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.