परवाना शिबिराचे आयोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:25 AM2021-06-26T04:25:17+5:302021-06-26T04:25:17+5:30
जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आलापल्ली : मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने मार्ग ...
जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
आलापल्ली : मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा
आष्टी : संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या वतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र, या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने, अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.
व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दुचाकी व हातठेल्यांची गर्दी असते. पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.
औद्योगिक वसाहती स्थापन करा
गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सूटवर वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्या, अशी मागणी आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर, तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे. अमिर्झा परिसरात अनेक गावांमध्ये रस्त्यावर जुने वीज खांब आले आहेत. काही ठिकाणी नव्याने रस्ते झाले. मात्र, खांबांची जागा बदलली नाही.
वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण
गडचिराेली : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कोरोनानंतर प्रशासनाने शिथिलता दिल्याने वाहने रस्त्यावर धावत आहेत, परंतु रस्त्याच्या कडेला काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दाेन्ही बाजूला दुकानदारांनी अतिक्रमण वाढविले आहे. गेटच्या बाहेर साहित्य ठेवतात.
एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमा
गडचिराेली : शहरातील विविध भागांमध्ये बँकांनी एटीएम सेवा सुरू केली आहे. ग्राहक याचा लाभही घेत आहेत. मात्र, काही ठिकाणी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून येत आहे. भविष्यात काही धोका झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे.
बेरोजगारांना मुद्रा कर्ज योजनेचा लाभ द्या
कुरखेडा : केंद्र सरकारने बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्याच्या उद्देशाने, मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रावर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र, या योजनेंतर्गत कर्ज देण्यास जिल्ह्यातील अनेक बँका चालढकल करीत आहेत. त्यामुळे बेरोजगार त्रस्त झाले आहेत.
सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षितच
गडचिरोली : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. या भागात वीज, पाणी, आरोग्य यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. दुर्गम भागातील अनेक गावे विकासापासून काेसाे दूर असल्याचे दिसून येते.
रिक्त पदांमुळे विविध योजना कागदावरच
गडचिराेली : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, तालुक्यात पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने विकासाच्या योजना पशुपालक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. पंचायत समितीने सुधारित आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी दिली आहे, पण पदे भरली नाहीत. त्यामुळे योजना कागदावरच राहिल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
तालुक्यात स्वच्छता मोहिमेचा बोजवारा
चामाेर्शी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. देशात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, काही नागरिकांमुळे अभियानाचा बोजवारा उडत आहे. मागणी करूनही प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार महत्त्वाचा आहे.
शहरातील अनेक वॉर्डांत सट्टापट्टी जोमात
अहेरी : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करत आहेत. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. सकाळपासूनच सट्टापट्टी लावण्यास सुरुवात होते. तालुक्याच्या अनेक माेठ्या गावात दिवसाढवळ्या सट्टापट्टी व जुगार खेळला जात आहे. अवैध धंदे सुरू असल्याने शहरी व ग्रामीण भागातील सामाजिक स्वास्थ्य धाेक्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक मूत्रिघर नसल्याने, जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मूत्रिघर तयार केली आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी केली जात आहे, परंतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी स्वच्छतागृहे निर्माण केली नाहीत.
तलाठी-ग्रामसेवकांच्या अनेक जागा रिक्त
एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी या पाचही तालुक्यात महसूल विभागांतर्गत येणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी, शेतकरी व नागरिकांची कामे खोळंबत असल्याचे दिसून येत आहे.
अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्ली दरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे या मार्गाची बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
साखरा बस थांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने, साखरा येथील बस थांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधक अभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.