जिल्हा कचेरीसमोर धरणे
By admin | Published: July 19, 2016 01:51 AM2016-07-19T01:51:02+5:302016-07-19T01:51:02+5:30
वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र नागरिकांना वनहक्क पट्टे वितरित करण्यात यावे, यासह विविध
गडचिरोली : वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र नागरिकांना वनहक्क पट्टे वितरित करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय जनहितवादी युवा समिती तथा अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्लीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना कार्यकर्त्याच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय जनहितवादी समितीचे संयोजक सुरेश बारसागडे, अहेरी जिल्हा कृती समितीच्या सरीता पुंगाटी यांनी केले. वनोपजाची बाजारात मागणी, दर व खरेदीदार याबाबतची माहिती मिळण्यासाठी ग्रामसभांची कार्यशाळा घेण्यात यावी, सुरजागड पहाडीवरील खनिजाची वाहतूक करण्यासाठी कंपनीला दिलेली लिज रद्द करण्यात यावी, जारावंडी, आष्टी, गट्टा, जिमलगट्टा या तालुक्यांसह अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)