सीईओंनी ठोकले बाल विकास कार्यालयाला कुलूप
By admin | Published: November 6, 2016 01:30 AM2016-11-06T01:30:57+5:302016-11-06T01:30:57+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी भामरागड पंचायत समितीला शनिवारी आकस्मिक भेट दिली असता,
भामरागडला आकस्मिक भेट : अधिकारी व कर्मचारी गैरहजर; विकासकामांचा आढावा
भामरागड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी भामरागड पंचायत समितीला शनिवारी आकस्मिक भेट दिली असता, भेटीदरम्यान एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या गोयल यांनी या कार्यालयास कुलूप ठोकले. आपले आदेश प्राप्त झाल्याशिवाय कुलूप उघडण्यास मनाईसुद्धा केली. गोयल यांच्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.
सीईओ गोयल यांनी शनिवारी भामरागड तालुक्याचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान पंचायत समिती भामरागड येथे अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवकांकडून विकास कामांचा आढावा घेतला. आढावा सभेदरम्यान मार्च २०१७ अखेर गृहकर, पाणीकराची वसुली १०० टक्के करण्यात यावी, घरकूल व शौचालय बांधकामाचेही उद्दिष्ट १०० टक्के गाठावे, असे निर्देश दिले. या बैठकीला एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने गोयल यांनी या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत अधिकची माहिती जाणून घेतली असता, एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. कार्यालयाला कुलूप ठोकल्यानंतर येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
भामरागड पंचायत समितीचे सभापती रंजना दिलीप उईके, पंचायत समिती सदस्य जे. डी. भांडेकर या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान सभापती उईके यांनी भामरागड तालुक्यातील बंद असलेल्या अंगणवाडी केंद्रांचा पाढा वाचला व यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर गोयल यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरीला भेट दिली. या भेटीदरम्यान डॉ. मिलींद मेश्राम हजर होते.
संपूर्ण दवाखान्याची पाहणी करून आरोग्य सेवेचे कौतुक केले. त्यानंतर अंगणवाडी केंद्र लाहेरीला भेट दिली. अंगणवाडी केंद्र नियमित सुरू राहत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. संपूर्ण दौरा आटोपून परत जात असताना दर महिन्याला भामरागड पंचायत समितीला आकस्मिक भेट दिली जाईल, या भेटीदरम्यान जे अधिकारी व कर्मचारी गैरहजर आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा सीईओ शांतनू गोयल यांनी दिला. (तालुका प्रतिनिधी)