कपड्यावरील रक्ताचे डागांमुळे पिता- पुत्रासह तिघांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:15 PM2024-05-21T21:15:45+5:302024-05-21T21:15:54+5:30
तान्हापोळ्यादिवशी भरचौकात तरुणाची हत्या: पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत फेकले जंगलात
संजय तिपाले / गडचिरोली: पूर्ववैमनस्यातून भरचौकात तरुणाची हत्या करुन मृतदेह जंगलात फेकला. मात्र, अंगातील कपड्यांच्या डागांमुळे तीन आरोपींना जन्मठेप व पावणे तीन लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली. आरोपींमध्ये पिता- पुत्राचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील सात वर्षांपूर्वी तान्हापोळ्याच्या दिवशी झालेल्या बहुचर्चित खून खटल्याचा निकाल २१ मे रोजी येथील विशेष जिल्हा व सत्र न्या. उत्तम एम. मुधाेळकर यांनी दिला.
दिनेश दिगांबर झिलपे (३७, रा. कोंढाळा) असे मयताचे नाव आहे. शामराव सोमा आलोने (५७), त्याचा मुलगा विनायक शामराव आलोने (३७) व राजू ढोरे (३६, सर्व रा. कोंढाळा) यांचा शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये समावेश आहे. शामराव आलाेने याचे चौकात कटलरी साहित्याचे दुकान होते. दिनेश झिलपे हा त्यास न विचारता दुकानातून साहित्य नेत असे. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. घटनेच्या आधी एक वर्षापूर्वी याच वादातून शामराव आलोने याने दिनेशवर कुऱ्हाडीने हल्ला केला होता. मात्र, नंतर त्यानेच उपचारखर्च केला, त्यामुळे हे प्रकरण पोलिसांत गेले नाही. मात्र, नंतर आलोने पिता- पुत्र दिनेश झिलपेकडे उपचारासाठी केलेला खर्च परत कर, अशी मागणी करु लागले. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा बिनसले.
२४ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी साडेसात वाजता चौकातील एका पानटपरीजवळ उभ्या असलेल्या दिनेश झिलपेवर लोखंडी रॉड व पावड्याने हल्ला केला. यात तो जागीच गतप्राण झाला. घटनेनंतर या तिघांनी दुचाकीवरुन त्याचे प्रेत कोंढाळा- रवी रोड मार्गे जंगलात नेऊन फेकले. दिनेशचे वडील दिगांबर झिलपे यांनी देसाईगंज ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांनाही जेरबंद केले. तत्कालीन उपअधीक्षक शैलेश काळे, सहायक निरीक्षक अतुल तवाडे यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल व ईतर पुरावे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान व सहायक सरकारी वकील नीलकंठ एम. भांडेकर यांनी न्यायालयात सादर केले. दंडाची एकूण पावणे तीन लाख रुपयांची रक्कम मयताच्या पत्नीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
मृताच्या पत्नीसमोरच हत्येचा थरार
तान्हापोळा असल्याने घटनेच्या दिवशी मयत दिनेश झिलपेची पत्नी नीता ही त्यास घरी बोलावून आणण्यासाठी चौकात आली होती. यावेळी हे तिघे त्याच्यावर रॉड व पावड्याने हल्ला करताना आढळून आले. ती या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. तिच्यासह इतर आठ ते नऊ जणांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली.