पत्नीला जीवे मारणाऱ्यांस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:11 AM2018-02-24T01:11:01+5:302018-02-24T01:11:01+5:30
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तलावात बुडवून तिची हत्या करणाऱ्या पतीस येथील सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हंसराज राजपूत रा.गोकुळनगर, गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तलावात बुडवून तिची हत्या करणाऱ्या पतीस येथील सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हंसराज राजपूत रा.गोकुळनगर, गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे.
हंसराज राजपूत याचे लग्न अश्विना हिच्याशी २००८ मध्ये झाले होते. लग्नानंतर दोघेही गोकुळनगर येथे राहू लागले. परंतु काही दिवसानंतर हंसराज हा पत्नी अश्विना हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करु लागला. अनेकदा दारुच्या नशेत तो पत्नीला मारहाण करीत असे.
१० मे २०१७ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अश्विना राजपूत ही गडचिरोली येथील आठवडी बाजारानजीकच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली. तिच्या मागेच हंसराजदेखील गेला. अश्विना कपडे धुवत असताना हंसराजने तिचे केस पकडून तिला खोल पाण्यात बुडवले. यातच तिचा मृत्यू झाला. मृत अश्विनाची आई शांताबाई मेश्राम हिच्या तक्रारीवरुन आरोपी हंसराज राजपूत याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालिन पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल लागला. सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षदारांचे बयाण नोंदविण्यात आले. सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी हंसराज राजपूत यास जन्मठेप व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश यू.एम. पदवाड यांनी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नीलकंठ भांडेकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली.
दहा महिन्यातच निकाल
ज्या तलावात घटना घडली. सदर तलाव गडचिरोली शहराच्या अगदी मध्यभागी आहे. मृतदेह पाहण्यासाठी पाळीवर शहरवासीयांची मोठी गर्दी जमा झाली होती. सदर घटना १० मे रोजीची असून या घटनेचा निकाल न्यायालयाने केवळ १० महिन्यात देत यातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.